नवी दिल्ली, दि. १७ - अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या १५ व्या लोकसभेत प्रथमच गांधी घराण्यातील चार जण एकाच वेळी दिसणार आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतीय राजकारणावर गांधी-नेहरू घराण्याचा प्रचंड प्रभाव राहिलेला आहे. तेव्हापासून आजतगायत बहुतांशवेळा एक तरी गांधी लोकसभेत आहेतच. यावेळी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल, मनेका यांच्यासह वरुणचाही या सर्वोच्च नागरी सभागृहात प्रवेश होणार आहे. वरुण गांधी प्रथमच लोकसभेत येणार आहेत. त्यांचा प्रवेश झाल्याने या सभागृहात गांधी घराण्यातील एकूण चार सदस्य विविध बाकांवर दिसणार आहेत. त्यापैकी दोन सत्तापक्षात तर उर्वरित दोन विरोधी पक्षात दिसतील, एवढाच काय तो फरक राहील.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे १९५२ मध्ये सर्वप्रथम लोकसभेत आले. १९६४ पर्यंत ते सभागृहात कायम होते. या काळात त्यांचे जावई फिरोज गांधी बहुतांश वेळा त्यांच्यासोबत होतेच. त्यानंतर इंदिराजींचा प्रवेश झाला. संजय गांधींच्या रुपाने १९७७ मध्ये गांधी घराण्यातील तिसरी पिढी संसदेत आली. त्यांच्यातही पंतप्रधान होण्याचे सर्व गुण होते. पण, अकाली मृत्यूने एक खुल्या विचारांचा गांधी आपल्यातून निघून गेला. इंदिराजी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी इच्छा नसतानाही राजकारणात पाऊल ठेवले. ते १९८१ च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर १९९१ पर्यंत ते लोकसभेत होते.
संजय गांधी यांच्या पत्नी मनेका यांनी १९८९ च्या निवडणुकीपासून जनता दलाच्या माध्यमातून लोकसभेत प्रवेश केला. त्यावेळी त्या पिलीभीतमधून निवडून आल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ १९९९ मध्ये सोनिया गांधी या सातव्या सदस्य संसदेत दाखल झाल्या. २००४ मध्ये राहुल आणि आता २००९ मध्ये वरुण गांधी हे लोकसभेत विराजमान होणार आहेत.
Monday, 18 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment