मंत्रिपदाच्या संख्येवरून वाद, द्रमुकचा आता सरकारला बाहेरून पाठिंबा
नवी दिल्ली, दि. २१ - डॉ.मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीस २४ तासांहून कमी वेळ राहिला असतानाच, मंत्रिपदाच्या संख्येबाबत आज द्रमुकने आक्रमक भूमिका घेत मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. आमचा पक्ष सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, असे द्रमुकतर्फे टी.आर.बालू यांनी जाहीर केले. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनीही मंत्रिपदांच्या संख्येबाबतची बोलणी फिसकटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. द्रमुकच्या अवाजवी मागण्या मान्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील कृती ठरविण्यासाठी द्रमुकने आपल्या कार्यकारिणीची तातडीचे बैठक चेन्नई येथे बोलाविली आहे.
मंत्रिपदाच्या संख्येबाबत कॉंग्रेसने सादर केलेला फॉर्मुला आपल्याला मान्य नसल्याचे श्री.बालू यांनी सांगितले.पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी द्रमुकचे अध्यक्ष एम.करूणानिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बालू यांनी मंत्रिपदाच्या संख्येबाबत बोलणी फिसकटल्याचे सांगून, आपला पक्ष एकही मंत्रिपद स्वीकारणार नाही, असे सांगितले. २००४ मध्ये असलेला फॉर्मुला पुन्हा लागू करावा, अशी मागणी द्रमुकने केली होती,असे बालू यांनी सांगितले. त्यावेळी तीन खासदारांमागे द्रमुकला एक मंत्रिपद देण्यात आले होते. भूपृष्ठ वाहतूक, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान व पर्यटन अशा खात्यांची मागणी द्रमुकने केली होती. तीन कॅबिनेट मंत्रिपदे, तीन किंवा चार राज्यमंत्रिपदे मिळावीत अशी मागणी द्रमुकने केली आहे. ए.राजा, टी.आर.बालू, दयानिधी मारन यांच्याव्यतिरिक्त करुणानिधीचे पुत्र अझागिरी व कन्या कनीमोझी यांनाही मंत्रिपदे मिळावित अशी मागणी करण्यात आली होती. २००४ सारखी स्थिती आता राहिलेली नाही, त्यामुळे द्रमुकची मागणी स्वीकारणे अशक्य असल्याचे कॉंग्रेसने द्रमुक नेत्यांना सांगितले आहे. यावेळी कॉंग्रेसजवळ स्वतःचे २०६ सदस्य आहेत. द्रमुकची संख्या १८ आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार द्रमुकला दोन कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे दिली जाऊ शकतात. तृणमल कॉंग्रेसने केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद मागितल्याचे उदाहरण कॉंग्रेस नेते देत आहेत. तृणमल कॉंग्रेसला तीन कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी कॉंग्रेसने दाखविली असून, रेल्वे मंत्रिपद ममता बॅनर्जी यांना मिळण्याची शक्यता आहे.
Friday, 22 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment