Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 May 2009

सरकार स्थापनेसाठी हालचालींना जोर

संपुआला आवश्यकता १२ खासदारांची

नवी दिल्ली, दि. १७ - लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी कोणाचे सहकार्य घेणार, याकडे संपुआच्या जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचे सरकार गठित करण्यासाठी अवघ्या १२ खासदारांची आवश्यकता कॉंग्रेसला आहे.
म्हणूनच हे १२ खासदार कोणत्या पक्षातील असतील, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुकीत साथ सोडून गेलेले लालू, पासवान आणि मुलायम यांना मंत्रिमंडळात कोणतेही स्थान देऊ नये अशी जोरदार मागणी आज रविवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत अनेक नेत्यांनी केल्यामुळे, कॉंग्रेस पक्ष कोणाचे सहकार्य घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
कॉंग्रेसला मोठ्या संख्येने जागा मिळाल्यानंतर आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसताच पदाच्या लालसेने कॉंग्रेससोबत जाण्यासाठी अनेक लहानमोठ्या पक्षांनी कॉंग्रेसचे गुणगान करीत आपली बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे, हे विशेष.
विजय मिळाल्यानंतर सायंकाळी पत्रपरिषदेत बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, अनेक लहान पक्ष व अपक्ष खासदार आमच्यासोबत येण्यास तयार आहेत, असे संकेत दिले होते. तर, अनेक पक्षांचे नेते अजूनही सातत्याने फोनवरून सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्याशी संपर्क साधत आहेत.
कॉंग्रेस अध्यक्षा व संपुआ प्रमुख सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पक्षाचे राजकीय सचिव अहमद पटेल, संरक्षणमंत्री ए.के.ऍण्टोनी, सरचिटणीस राहुल गांधी या कॉंग्रेसी नेत्यांसह राजद नेते लालू प्रसाद यादव, लोजपा प्रमुख रामविलास पासवान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजवादी पार्टी, डीएमके (द्रविड मुनेत्र कडघम), तृणमूल कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचे नेते उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित नेत्यांना कॉंग्रेसने सांगितले की, आम्ही गृह, संरक्षण आणि अर्थखाते स्वत:कडे ठेवणार असून इतर खात्याबाबत तडजोड होऊ शकते. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव या दोघांनीही रेल्वे मंत्रालयाची मागणी केली. कॉंग्रेसने लालूंना ग्रामीण विकास मंत्रालय स्वीकारण्याबाबत विचार करावा अशी सूचना केली. त्याचवेळी डीएमकेने आपल्याला सात खाती मिळतील की नाही याची चाचपणी केली. अखेर सविस्तर चर्चेअंती कार्यकारिणीने मनमोहन सिंग यांना सभागृहाचे नेते आणि सोनिया गांधी यांना पक्षाच्या तसेच संपुआच्या नेतेपदी निवडण्यासोबतच सत्तास्थापनेसाठी सोमवारी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
सोनिया गांधींनी यानंतर लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचप्रमाणे अन्य घटक पक्षांसोबतही स्वतंत्र चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपुआला बहुमतासाठी आणखी केवळ १२ खासदारांची आवश्यकता असून त्यांच्याकडे अनेक पर्यायही आहेत. पहिला पर्याय सपा असून त्यांच्याकडे २२ खासदार आहेत. यात संपुआचे २६० खासदार मिळविले तर हा आकडा २८२ पर्यंत पोहोचतो. हा सर्वात सहज पर्याय असू शकतो. परंतु राकॉंचा विरोध बघता, ही शक्यता फारच कमी वाटते. अशात कॉंग्रेसला राजद ४, टीआरएस २, जेडीएस ३, एआयएमआयएमच्या एका खासदाराचे सहकार्य मिळू शकते. यांच्यासह कॉंग्रेसकडे २७० खासदार राहतात. सरकार स्थापण्यासाठी अपक्ष दिग्वीजय सिंग आणि सिंहभूम येथील अपक्ष मधु कोडा यांचेही समर्थन मिळू शकते. हा आकडा २७२ वर पोहोचतो. असे असले तरी सोनियांनी राजद आणि सपालाही चर्चेसाठी आमंत्रित केले होते.

No comments: