मूर्तिभंजन प्रकरणी थोरला भाऊ महेंद्रचा दावा
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : राज्यात होणाऱ्या मूर्ती तोडफोड प्रकरणात कवेश गोसावी याला पोलिस नाहक गुंतवण्याचा प्रयत्न करीत असून या प्रकरणाची "सीबीआय' चौकशी करा, अशी मागणी कवेशचा थोरला भाऊ महेंद्र गोसावी यांनी केली आहे.
"पोलिस माझ्या भावाचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. पोलिस असे का करीत आहेत, हे कळण्यास मार्ग नाही. आम्ही नाथपंथी आहोत. कवेशसह आमच्या घरातील कोणीही देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. माझा भाऊ असले दुष्कृत्य करूच शकत नाही. कवेश निर्दोष आहे आणि मी हे फातर्पेकरणीच्या मंदिरात उभा राहून सांगू शकतो. अन्यथा पोलिसांनी मंदिरात येऊन कवेशच्या विरोधात पुरावे असल्याचे सिद्ध करावे,' असे आव्हान महेंद्र यांनी दिले आहे.
पोलिस पत्रकारांना हाताशी धरून खोट्या बातम्या पसरवत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यात कवेश लाजेने घराच्या बाहेरही गेला नाही. केवळ सकाळच्या वेळी काजू बागायतीत जाऊन येत होता. त्यानंतर तो घराबाहेरही पडत नव्हता. तुरुंगांत राहून आल्याने आणि आता त्याची लाज वाटत असल्याने यावेळी पहिल्यांदाच त्याने मतदानही केले नसल्याचे महेंद्र म्हणाला.
पोलिसांकडे त्याच्या विरोधात कोणतेच पुरावे नसताना कोणत्या आधारावर त्याला अटक केली आहे, असा प्रश्न महेंद्र यांनी विचारला. दोन महिन्यांपूर्वी गुडीपारोडा येथील मूर्ती मोडतोड प्रकरणात कवेशला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्याची ब्रेंन मॅपिंग आणि पॉलिग्राफी चाचणी करण्यासाठी त्याला बंगळूर येथे नेण्यात आले. त्याचे पॉलिग्राफी आणि ब्रेंन मॅपिंग करण्यात आले. त्याचा अहवाल मात्र पोलिसांनी अद्याप न्यायालयात सादर केलेला नाही, अशी माहिती महेंद्र यांनी दिली. अटक केलेल्या अल्लाबक्ष याची पत्नी या प्रकरणात असून ती आमची सावत्र बहीण आहे. त्यामुळेच कवेश तिच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. तथापि, अल्लाबक्षशी आमचा कोणताही संबंध नाही. एक मूर्ती तोडण्यासाठी त्याला पाच हजार मिळत होते, असे जे पोलिस सांगत आहे, ते ही खोटे आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला एक लाख मिळाल्याचे सांगितले होते. ते एक लाख त्याने कुठे ठेवले हे शोधण्यास पोलिसांना अपयश आल्याने आता पाच हजारच्या रकमेवर पोलिस आले असल्याचे महेंद्र म्हणाले. मूर्तीची मोडतोड कोण करतो हे उघड झालेच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. त्यासाठी पोलिसांनी कवेश याची नार्को चाचणी करावी, जेणे करून सत्य उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.
Sunday, 17 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment