फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी) : सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने अखेर दहाव्या खुनाची कबुली दिली असून मळेभाट कुडका येथील कु. सुशीला तानू फातर्पेकर हिचा ऑक्टोबर २००७ मध्ये रायबंदर येथे नदीच्या किनाऱ्यावर खून केल्याची कबुली दिली आहे.
इस्पितळात सुशीलाशी झालेल्या ओळखीचे रूपान्तर महानंद याने मैत्रीत केले. सुशीला हिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या कुटुंबीयांना दाखविण्यासाठी घरातून दागिने घालून येण्याची सूचना केली. कु. सुशीला घरातून जाताना सोन्याची काकणे, सोन्याचा हार, सोनसाखळी आदी सुमारे पन्नास हजार रुपयांचे दागिने घातले होते. आपल्या घरच्यांना दाखविण्याच्या बहाण्याने महानंद याने सुशीला हिला रायबंदर येथे नेले आणि तेथे तिचा गळा आवळून खून केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या सुशीला हिच्या खून प्रकरणाचा तपास आगशी पोलीस करणार आहेत, असे उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी सांगितले. सध्या याप्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर आहे. सुशीलाचा खून करण्यात आलेली जागा, तिचा मृतदेह कुठे टाकला व इतर बाबींची पडताळणी केली जात आहे, असेही श्री. डायस यांनी सांगितले. गोव्यातील विविध भागातून बेपत्ता महिला, युवती संबंधी माहिती फोंडा पोलिसांना मिळत आहे. महानंदची खून करण्याची पद्धतीला मिळती जुळते प्रकरण असल्यास त्याची चौकशी केली जात आहे, असेही उपअधीक्षक श्री. डायस यांनी सांगितले.
कु. सुशीला हिला तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत. सुशीला ही सर्वांत लहान होती. तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. घरातून जाताना सोन्याचे दागिने आणि पासबुक घेऊन गेली होती, असे तिची मोठी बहीण सौ. पिरू चंद्रू कानोलकर (करमळी) हिने सांगितले.
कुर्टी येथील कु. योगिता नाईक खून प्रकरणाच्या तपासासाठी घेण्यात आलेला महानंद नाईक याचा चौदा दिवसांचा रिमांड २० मे ०९ रोजी समाप्त होत आहे. त्याला २० रोजी येथील न्यायालयात उभा करून तरवळे येथील कु.दर्शना नाईक हिच्या खून प्रकरणी रिमांड घेतला जाणार आहे. कु. दर्शना हिचा बांबोळी येथे खून केल्याची कबुली महानंद नाईक याने दिली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महानंद नाईक याने आत्तापर्यंत दहा खुनांची कबुली दिलेली आहेत. त्यातील काहींचे मृतदेह सापडले आहेत. तर काहींचे मृतदेह पाण्यात टाकल्याचे संशयित महानंद नाईक याने सांगितले आहे. योगिता नाईक, दर्शना नाईक या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर सुनिता गांवकर, निर्मला घाडी, सूरत गांवकर, अंजनी गांवकर, वासंती गावडे, केसर नाईक, नयन गांवकर यांच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागलेला नाही. केरये खांडेपार येथे एक मृतदेह टाकण्यात आलेल्या ठिकाणी मानवी हाडे आढळून आली आहेत.
क्रूरकर्मा महानंद नाईक प्रकरणाच्या तपासाकडे लोकांचे सुध्दा लक्ष लागलेले आहेत. याप्रकरणातील संशयित महानंद नाईक याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी सुध्दा याप्रकरणामध्ये कच्चे दुवे राहून नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील तपास करीत आहेत.
------------------------------------------------------------
सुशीलाशी इस्पितळात ओळख
मळेभाट कुडका येथील कु.सुशीला तानू फातर्पेकर ही युवती २४ ऑक्टोबर ०७ पासून बेपत्ता आहे. यासंबंधी आगशी पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल झालेली आहे. कु. सुशीला ही मिरामार पणजी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. संशयित महानंद नाईक याची मुलगी आजारी पडल्याने याच इस्पितळात उपचारासाठी काही दिवस दाखल करण्यात आले होते. त्यावेळी महानंद नाईक याची सुशीला हिच्याशी ओळख झाली.
Wednesday, 20 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment