केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो पहिला विस्तार करण्यात येईल, त्यात फारुख अब्दुल्ला यांचा समावेश केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिले असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी यांनी आज येथे पत्रकारांना दिली. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार मंगळवार, २६ मे रोजी करण्यात येणार असून त्यावेळी पाच मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
२६ मे रोजी करण्यात येणाऱ्या विस्तारात फारुख अब्दुल्ला यांच्यासह मुकुल वासनिक व विलास मुत्तेमवार यांचाही समावेश केला जाण्याची शक्यता सूत्राने बोलून दाखविली.
फारुख अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून काल रात्री राजधानी नवी दिल्लीत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्यामुळे फारुख अब्दुल्ला नाराज झाले असल्याचेही वृत्त आले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांना बोलावून घेतले आणि पुढील विस्ताराच्या वेळी समावेश करून घेण्याचे आश्वासन दिले, असेही ओमर म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सने कोणत्याही खात्यासाठी आग्रह धरला नव्हता. फक्त एवढीच माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता की, पंतप्रधानांसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा समावेश आहे की नाही, असे ओमर यांनी कालच येथे सांगितले होते.
दरम्यान, पंतप्रधानांसोबत शपथग्रहण करण्याची आपल्याला संधी नसल्याचे समजताच फारुख अब्दुल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पथकासोबत दक्षिण आफिकेला रवाना झाले. हे पथक दक्षिण आफिकेत आयोजित आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्याचा आनंद घेणार आहे.
पुढील मंगळवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता असून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्यासह द्रमुकच्याही सदस्यांचा त्यात समावेश केला जाण्याची शक्यता आहे, अन्य एका सूत्राने व्यक्त केली.
नऊ खात्यांची मंत्रिपदं मिळावीत म्हणून द्रमुकने काल आग्रह धरला होता. पाच कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रिपदे मिळावीत, हा द्रमुकचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्यानंतर द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी चेन्नईला परतले होते. दरम्यान, द्रमुकने संपुआ सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि संपुआतर्फे देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी चेन्नईत बैठक आयोजित करण्याचे ठरले होते.
द्रमुकच्या नेत्यांचे मन वळविण्यासाठी कॉंग्रेसने गुलाम नबी आझाद यांना चेन्नईला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टाईत आझाद यांना यश आले आणि द्रमुकने मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे ठरविले तर मंगळवारी होणाऱ्या पहिल्या विस्ताराच्या वेळी त्यांचेही सदस्य शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Saturday, 23 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment