Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 19 May 2009

अखेर अडवाणीच विरोधी पक्षनेते

भाजप नेत्यांची ठाम भूमिका
नवी दिल्ली, दि. १८ : भारतीय जनता पक्षाचे संसदीय मंडळ, महामंत्री व सर्व भाजप मुख्यमंत्री यांच्या ठाम भूमिकेनंतर भाजपनेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी राहण्यास आज आपली मौन संमती दिली.
श्री. अडवाणी यांच्या ३० पृथ्वीराज रोड या निवासस्थानी आज सकाळी ११ वा. भाजप संसदीय मंडळ व भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली. बैठकीच्या प्रारंभीच पक्षाध्यक्ष श्री. राजनाथसिंग यांनी अडवाणी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राहावे, अशी भूमिका घेतली.
राजनाथसिंगांच्या या भूमिकेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडुरुप्पा, हिमाचलचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, उत्तराखंडचे भुवनचंद्र खंडुरी तसेच सर्वश्री व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, अनंतकुमार, गोपीनाथ मुंडे प्रभृतींनी अडवाणी यांनी या संकटाच्या समयी पायउतार होऊ नये, अशी भूमिका घेतली. बैठकीत उपस्थित असलेले डॉ. मुरली मनोहर जोशी व श्रीमती सुषमा स्वराज यांनीही अडवाणी यांनी या पदावर कायम राहावे, असे सांगितले.
शनिवारच्या पराभवानंतर सायंकाळी श्री. अडवाणी यांनी लोकसभेतील नेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काल सकाळपासून पक्षाचे नेते त्यांना भेटून त्यांनी या क्षणी असा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करीत होते. "आज तुम्ही नेतेपद सोडल्यास पक्षाचे नुकसानच होईल, तसा निर्णय मुळीच घेऊ नका,' असे पक्षाचे नेते त्यांना भेटून सांगत होते. पक्षाच्या काही नेत्यांनी काल परस्परांशी चर्चा करून आज सकाळी मुख्यमंत्री व संसदीय मंडळाच्या बैठकीत या आशयाचा ठराव आणल्याचा निर्णय घेतला व आजच्या बैठकीत तसा ठराव पारित करण्यात आला. दोन तास झालेल्या या बैठकीत स्वत: अडवाणी एक शब्दही बोलले नाहीत, असे समजते.

1 comment:

Lost Paradise said...

This is very bad. Advani should now play the role of only a mentor.