Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 17 May 2009

श्रीपाद यांची हॅट्ट्रिक, सार्दिनही विजयी

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या आज झालेल्या निकालाअंती गोव्यातील दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांनी आपले स्थान अबाधित ठेवत विजयी परंपरा राखण्यात यश प्राप्त केले. उत्तरेत भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांच्यावर केवळ ६३५३ मतांनी आघाडी घेत ऐतिहासिक "हॅट्ट्रिक' साधली, तर दक्षिणेत कॉंग्रेसचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी पक्षांतर्गत बंडाला चोख उत्तर देत आपले प्रतिस्पर्धी भाजपचे ऍड. नरेंद्र सावईकर यांच्यावर १२,५१६ मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे उत्तरेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तर दक्षिणेत युगोडेपा पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याने श्रीपाद व सार्दिन यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
आज सकाळी नियोजित वेळी दोन्ही ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ झाला. उत्तरेत व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय तर दक्षिणेत रामनाथ कारे कायदा महाविद्यालयात मतमोजणीचे काम हाती घेण्यात आले होते. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. उत्तरेत दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीस बारा हजार मतांच्या आघाडीवर असलेल्या श्रीपाद नाईक यांची आघाडी हळूहळू कमी होऊन पाच ते सहा हजारांपर्यंत पोचल्याने भाजप नेते अस्वस्थ बनले होते तर दक्षिणेत सुरुवातीस भाजपचे ऍड. सावईकर यांना मिळालेल्या मतांमुळे कॉंग्रेसवाल्यांचे धाबेच दणाणले होते.
उत्तर गोव्यात भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांचा विजय निश्चित असल्याची जोरदार हवा होती, मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांनी अल्पावधीतच जबरदस्त आव्हान उभे केल्याने ती ओसरत असल्याचे दिसून आले. देशप्रभूंच्या मागे सत्तरीचे राणे पितापुत्र ठामपणे उभे राहिल्याने भाजप गोटातही काहीशी अस्वस्थता पसरली होती. विश्वजित राणे यांनी पर्ये व वाळपई मतदारसंघातून देशप्रभू यांना ११,६१२ मतांची आघाडी मिळवून दिली. डिचोली, साखळी व मये मतदारसंघात मात्र त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. या तिन्ही मतदारसंघात श्रीपाद यांनी देशप्रभू यांच्यावर ९६०० मतांची आघाडी घेतली व हीच आघाडी अखेर त्यांना फायदेशीर ठरली. उत्तरेतील उर्वरित वीस मतदारसंघांपैकी दहा मतदारसंघात श्रीपाद यांनी आघाडी मिळवण्यात यश मिळवले. मगोकडे असलेल्या प्रियोळ मतदारसंघातही भाजपला ४८४९ मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे मगोच्या या मतदारसंघात मगोपेक्षा भा.क.प.ला जास्त मते मिळाली. जितेंद्र देशप्रभू हे खुद्द त्यांच्या पेडणे तालुक्यातून आघाडी मिळवण्यात अपयशी ठरले. पेडण्यातील दोन्ही मतदारसंघात मिळून श्रीपाद यांनी त्यांच्यावर ३९४ मतांची आघाडी घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या एकमेव थिवी मतदारसंघातून देशप्रभू यांना केवळ १५८ मतांची आघाडी मिळाली. ताळगाव, कळंगुट, सांतआंद्रे, हळदोणा, सांताक्रुझ, कुंभारजुवा आदी आघाडी सरकारकडे असलेल्या मतदारसंघातूनही देशप्रभू यांना अल्प का होईना पण आघाडी मिळवून देण्यात संबंधित आमदारांनी यश मिळवले. भाजपच्या विधानसभेतील मतदारसंघातून श्रीपाद यांना आघाडी मिळवून देण्यात स्थानिक आमदार यशस्वी ठरले खरे परंतु विश्वजित राणे यांनी लक्ष्य बनवलेल्या डिचोली, मये व साखळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेली सचोटी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. २००४ सालच्या तुलनेत राष्ट्रवादीला ४२,७३४ मते जास्त मिळाली तर भाजपला ७१२६ मते कमी पडली.

दक्षिणेत अखेर सार्दिन यांनी बाजी मारलीच
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात युगोडेपाचे उमेदवार माथानी साल्ढाणा "फॅक्टर' पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याने अखेर कॉंग्रेसचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी हा मतदारसंघ राखला. भाजपचे नवोदित उमेदवार ऍड.नरेंद्र सावईकर यांच्यावर त्यांनी १२५१६ मतांनी विजय मिळविला. सार्दिन यांना १,२७,४९४ तर ऍड. सावईकर यांना १,१४,९७८ मते मिळाली. युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांना अवघी १६,७२७ मते मिळाली. एरवी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही भाजपने यावेळी कॉंग्रेसला दिलेली टक्कर विशेष उल्लेखनीय ठरली. फोंडा, मडकई, मुरगाव, वास्को, कुडचडे, सावर्डे, सांगे व काणकोण अशा आठ मतदारसंघात जरी भाजप उमेदवाराने आघाडी घेतली असली तरी सासष्टीतील वेळ्ळी, नुवे, कुडतरी, बाणावली, कुंकळ्ळी व कुठ्ठाळी मतदारसंघांतील कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी पक्षाला भक्कम पाठिंबा दिल्याने सार्दिन यांचा विजय सुकर झाला. निवडणुकीपूर्वी फातोर्डा, नावेली, बाणावली आदी मतदारसंघात जे भाजपसाठी अनुकूल चित्र दिसत होते ती केवळ हवाच होती हे आज निकालाअंती स्पष्ट झाले. शिरोडा, फातोर्डा सारखे मतदारसंघ भाजपला अपेक्षेप्रमाणे आघाडी देऊ शकले नाहीत. पण, नावेली, मडकई, फोंडा येथून मिळालेल्या मतांमुळे कॉंग्रेसचे आघाडीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात खुंटले. ऍड. सावईकर यांना गृहमंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघातून २०३७ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीत सुदिन ढवळीकर यांची प्रमुख भूमिका असल्याने भविष्यात रवी नाईक यांच्यासमोर जबरदस्त आव्हान निर्माण होणार, याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. मडकई मतदारसंघातून ऍड. सावईकर यांना ६२४६ मतांची आघाडी मिळाली. भाजपकडे असलेल्या शिरोडा मतदारसंघात मात्र सार्दिन यांनी केवळ १०४ मतांची आघाडी मिळवली.
आज सकाळी कारे कायदा महाविद्यालय व दामोदर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील ७ सभागृहांत मतमोजणी सुरू झाली. भाजपचे नरेंद्र सावईकर, फ्रांसिस सार्दिन त्यांचे पुत्र यावेळी हजर होते. अन्य कुणीही उमेदवार याठिकाणी दिसत नव्हते. जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे, पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यावेळी मतमोजणीवर नजर ठेवून होते.
टपाल मतदानांत सार्दिन यांना ९२, सावईकर यांना १६२ मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. फोंडा तालुक्यातील मतमोजणीनंतर आघाडीवर असलेले ऍड. सावईकर सासष्टीतील निकालानंतर मागे पडत गेले. कुठ्ठाळी, नुवे येथील मतमोजणी नंतर ते बरोबरीत राहिले व सावर्डे, सांगे येथील मतमोजणी नंतर त्यांना परत आघाडी मिळाली. बाणावली, कुंकळ्ळी व वेळ्ळीतील कॉंग्रेसच्या आघाडीमुळे ते पिछाडीवर पडत गेले. मतमोजणीची सुरुवात भाजपच्या आघाडीने झाल्याने याठिकाणी कॉंग्रेसचे प्रमुख नेते फिरकलेच नाहीत. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर दाखल झाले. आमदार बाबू कवळेकर, वीजमंत्री आलेक्स सिकेरा यापूर्वी दाखल झाले. गेल्या नोव्हेंबर २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे फ्रांसिस सार्दिन यांना ११८५८३ मते पडली होती तर भाजपचे विल्फ्रेड मिस्कीता यांना ७७६८१ मते पडली होती. या खेपेला गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपने ३७२९७ मते जादा मिळवली तर कॉंग्रेसला फक्त ८९११ मते जादा पडली.

No comments: