एक रहिवासी गंभीर जखमी
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - पसरेभाट ताळगाव येथे आज सकाळी शाम गावकर यांच्या घरात घुसून तीन वाहनांची मोडतोड व त्यांचे वडील सगुण गावकर(६५) यांच्यावर लोखंडी सळीने वार करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपाखाली शेजारी राहणाऱ्या नीलेश च्यारी ऊर्फ झिलू (३५) याच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी निलेश च्यारी याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. या घटनेनंतर त्याने पळ काढल्याने तो हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्री. गावकर यांच्या घरावर सकाळी सहा वाजता हा हल्ला झाला. याची त्वरित माहिती पोलिसांना देऊनही पोलिस घटनास्थळी पोचले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. सुमारे १० वाजता पोलिसांनी याठिकाणी भेट देऊन पंचनामा केला.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, आज सकाळी सुमारे सहा वाजता नीलेश एक लोखंडी सळी घेऊन तक्रारदार शाम याच्या घरात घुसला. यावेळी त्याने घराच्या बाहेर उभ्या करून ठेवलेल्या वाहनांची नासधूस केली. यात होंडा सिटी जीए ०७ सी ९७०८, वॅगनर जीए ०१ एस ९७०८ व एक डियो जीए ०४ बी ४५५१ या वाहनांची मोडतोड केली. यावेळी सगुण गावकर धावत बाहेर आले असता त्यांच्यावरही लोखंडी सळीने हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मारहाण होत असल्याने अडवण्यासाठी आलेला शाम गावकर यांनाही मारहाण करण्यात आली. यात सगुण गावकर जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याविषयीची अधिक तपास साहाय्यक उपनिरीक्षक आमोणकर करीत आहेत.
Monday, 18 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment