१९७२ ते २००७... ३७ वर्षे, हजारो लोकांचे बळी, लाखो लोकांचे हाल, सशस्त्र संघर्ष आणि अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार...तो निर्धार संपलेला दिसत नाही आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम्चा (लिट्टे) सर्वेसर्वा वेलुपिल्लई प्रभाकरनचा आता अंत झाल्याचा श्रीलंकेच्या लष्कराचा दावा आणि तो अद्याप जिवंत असल्याचा प्रतिदावा ही दोन टोके सुद्धा कायम आहेत. ३७ वर्षांचा रक्तरंजित संघर्ष एका वळणावर येऊन थांबलाय् एवढे मात्र खरे. प्रभाकरन खरोखर जिवंत असेल तर हा लढा पुनरुज्जीवित होऊ शकतो. मात्र, ज्या पद्धतीने श्रीलंकेच्या लष्कराने लिट्टेचे कंबरडे मोडले, त्यावरून लिट्टेकडे आता पूर्वीसारखी ताकद असणार नाही. प्रभाकरन खरोखर मारला गेला असेल तर मात्र लिट्टेच्या पुनरुज्जीवनाची सूतराम शक्यता नाही. श्रीलंकेत शांती सेना पाठविण्याच्या निर्णयासाठी प्रभाकरनने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जी शिक्षा ठोठावली होती, त्या तुलनेत प्रभाकरनचे मरण हे वीराचेच ठरणार आहे हे मान्य केले तरी त्याला असाच मृत्यू येणार हे अपेक्षितच होते. सात वर्षांपूर्वी प्रभाकरनने अखेरचे दर्शन दिले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत त्याला राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल विचारले होते तेव्हा "इट्स अ ट्रॅजिक इन्सिडंट' एवढेच तो म्हणाला होता. परंतु, ज्या निर्घृणपणे राजीव गांधी यांना ठार करण्यात आले होते, त्याने सारे जग हादरले होते. राजीव गांधींना संपविण्याचे कारस्थान लिट्टेचे आणि त्यातही प्रभाकरनचेच होते, हे नंतरच्या काळात स्पष्ट झाले. राजीव गांधी यांची हत्या ही प्रभाकरनच्या रक्तरंजित कारवायांमधील एक घटना होती. रक्तपात प्रभाकरनसाठी नवा नव्हताच. तब्बल तीस वर्षे त्याने लंकेच्या छातीवर अनेकांचे रक्त सांडविले. अनेक प्रकारच्या वाटाघाटी, करार, युद्धबंदी हे सारे करून सुद्धा लिट्टेचा संघर्ष थांबत नव्हता. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीलंकेच्या सरकारने राष्ट्रीय निर्धार दाखवत लिट्टेचे कंबरडे मोडले. प्रभाकरन जिवंत असेल तरी आता लिट्टेला संपविणे श्रीलंकेच्या हातात आहे. १९७२ सालापासून सुरू असलेल्या अतिरेकी कारवायांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात श्रीलंकेच्या लष्कराला यश आले आहे. त्यामुळे आता श्रीलंकेत शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा करणे शक्य आहे. अर्थात, त्यासाठी श्रीलंकेच्या अल्पसंख्य-बहुसंख्य धोरणात काही बदल होणे आवश्यकच आहे. ते न झाल्यास लिट्टेसारखी संघटना पुन्हा उभी होईल, असे मानण्याचे कारण नसले तरी तामिळांचा संघर्ष पूर्णतः थांबणार नाही. लिट्टेचा उदय तामिळी अल्पसंख्यकांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या व राष्ट्रीय प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यात आले असल्याच्या भावनेतूनच झाला होता, हे यासंदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे.
१९७२ साली स्थापन झालेल्या तामिळी तरुण तुर्कांची तमिल न्यू टायगर्स (टीएनटी) ही संघटना ते २००० नंतर हवाईहल्ले व पाणबुड्यांच्या मार्गाने लढणारी लिट्टे नावाची दहशतवादी संघटना हा प्रवास ३७ वर्षांचा. या प्रवासात प्रभाकरन कुठेच थांबला नाही. तामिळांचे स्वायत्त राष्ट्र ही त्याची मागणी होती. त्यावरही त्याने कधीच तडजोड स्वीकारली नाही. १९७६ साली टीएनटीतूनच लिट्टे नावाची संघटना आकाराला आली. ७८ साली प्रभाकरनने पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली. तामिळांची स्वतंत्र मातृभूमी, तामिळांचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व आणि तामिळांना स्वयंनिर्णयाचा अधिकार ही आमची त्रिसूत्री असल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले आणि तेव्हापासून संघर्ष सुरू झाला. संघर्षाचा प्रारंभ झाला तो जाफन्यात. १९८३ मध्ये तिथे १३ सैनिकांना लिट्टेने ठार केले. तामिळांमध्येही काही प्रमाणात अंतर्गत संघर्ष होता. तो संपविण्यासाठी तीन वर्षे नियोजन करून १९८६ मध्ये लिट्टेने सर्वांत मोठ्या स्पर्धक गटाला संपविले आणि वेलुपिल्लई प्रभाकरनची "लंकेतील तामिळांचा तारणहार' अशी प्रतिमा बनली. १९८७ साली त्याने श्रीलंकेच्या ईशान्येत तैनात असलेल्या भारतीय सैन्याशी संघर्ष केला. त्यात शेकडो सैनिक ठार झाले आणि सैन्याने माघार घेतली. १९८९ मध्ये त्याने तत्कालीन अध्यक्ष रणशिंगे प्रेमदासा यांच्याशी चर्चा केली. परंतु, पुढच्याच वर्षी म्हणजे ९० साली जाफना द्विपकल्पावर कब्जा मिळवून तेथे समांतर सरकार स्थापन केले. पुढे लिट्टेने सहाशे पोलिसांची कत्तल केली. १९९१ मध्ये त्याने रंजन विजेरत्ने या संरक्षण मंत्र्याला संपविले आणि त्याच वर्षी राजीव गांधींचीही मानवी बॉम्ब वापरून हत्या केली. श्रीलंकेत भारतीय शांति सेना पाठविण्याच्या राजीव गांधींच्या निर्णयाचे उट्टे त्याने राजीवजींना संपवूनच काढले. राजीव गांधी यांच्या हत्येचे कवित्व संपत नाही तोच, १९९३ मध्ये राष्ट्राध्यक्ष प्रेमदासा यांना लिट्टेने ठार मारले. त्यानंतरच्या काळात ९४-९५ मध्ये अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांच्याशी चर्चा करण्यास मान्यता दिली आणि नंतर जाफन्यावरील लिट्टेचा ताबा सुटला. परंतु, पुढच्याच वर्षी त्याने लष्करी छावणीवर हल्ला करून १२०० सैनिक व पोलिसांची कत्तल केली. सरकार वाटाघाटीतून मार्ग काढू पाहत होते आणि दरम्यानच्या काळात लिट्टेच्या कारवाया आणि प्रभावक्षेत्र वाढत होते. १९९८-९९ पर्यंत लंकेच्या ईशान्येतील बराच मोठा भाग लिट्टेच्या छत्रछायेखाली आला होता. २००१ मध्ये श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लिट्टेने हल्ला केला. हे प्रकरण अतिशय गंभीर होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षात मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यामुळे २००२ मध्ये लिट्टे व श्रीलंकेचे सरकार यांच्यात शांततेचा करार झाला. परंतु, असा करार प्रभाकरनच्या प्रकृतीला मानवणारा नव्हता. २००३ मध्येच त्याने हा करार आपल्याला मान्य नाही, असे स्पष्ट करून टाकले. लिट्टेत त्यामुळे मतभेद निर्माण झाले. करुणा नावाचा त्याचा एक साथीदार हजारो बंडखोरांना घेऊन बाहेर पडला... ते साल होते २००४. परंतु, प्रभाकरनच्या "लिट्टे'ला थांबणे जणू माहितीच नव्हते. तिच्या कारवाया सुरूच राहिल्या. २००५ मध्ये लिट्टेने लंकेच्या परराष्ट्र मंत्र्याला ठार केले, २००६ मध्ये लष्करप्रमुखाला ठार करण्याचा प्रयत्न केला, २००७ मध्ये कोलंबोवर हवाई हल्ला चढविला...आणि इथे मात्र श्रीलंकेच्या सरकारची सहनशक्ती संपली. आता काहीही झाले तरी लिट्टेला नामशेष केल्याविना थांबणार नाही, असे सरकारने जाहीर केले आणि लष्कराला त्यासाठी पूर्णतः मोकळीक देण्यात आली. लष्कराने चारही बाजूंनी चढाई करून लिट्टेला जेरबंद केले आणि पार पांगळे करून टाकले. प्रभाकरन ठार झाला नसेल तर तो ठार होईल आणि ठार झाला नाही तरी तो पुन्हा पूर्ववत लिट्टे उभी करू शकणार नाही, एवढी कामगिरी श्रीलंकेच्या लष्कराने केलेली आहे. त्यामुळेच आम्ही आता शस्त्रे खाली ठेवत असल्याची बतावणी लिट्टेने सुरू केलेली आहे आणि त्याच वेळी प्रभाकरनसह त्याचे बिनीचे साथीदार अद्याप जिवंत असल्याचा दावाही केला जात आहे. लिट्टेच्या म्होरक्यांचे मृतदेह ताब्यात आल्यावर आणि त्यांच्या डीएनए चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच प्रभाकरनच्या मृत्यूबद्दल ठामपणे सांगता येणे शक्य आहे. ठार झाल्याच्या अफवा ओसामा बिन लादेनबद्दलही उठल्या होत्या. मात्र, ओसामा आणि प्रभाकरन यांच्यातला फरक असा की, ओसामाच्या संघटनेचे अद्याप कंबरडे मोडलेले नाही. लिट्टेचे मात्र कंबरडेच मोडले गेले आहे. लंकेतील तामिळबहुल भागात लिट्टे म्हणजे समांतर सरकार होते. समांतर सरकार चालविणारी मातब्बर संघटना ते जीव वाचवत पळत सुटलेल्यांची संघटना ही अवस्था लष्करी कारवाईमुळे लिट्टेची झाली आहे. एकेकाळी, अगदी अलीकडच्या काळापर्यंत, लिट्टेचे तामिळ इलम् पोलिस दल, शिक्षण विकास मंडळ, लष्करी प्रबोधिनी, व्हॉईस ऑफ टायगर्स ही प्रसारवाणी, राष्ट्रीय दूरचित्रवाहिनी, न्यायालये, विधी व न्याय विभाग, मध्यवर्ती बॅंक, कस्टम्स एजंसी, असा सगळा, एखाद्या सरकारी यंत्रणेला शोभेल असा, लवाजमा लिट्टेने उभा केला होता. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्कही वाढविला होता. त्यामुळे लिट्टेची ताकद हा श्रीलंकेच्या शासकांपुढचा सर्वांत मोठा प्रश्न होता. प्रारंभी टीएनटीला श्रीलंकेतील सिंहली या बहुसंख्यकांच्या विरोधात संघर्ष करणारी संघटना, असे स्वरूप होते. लंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पसंख्याकांचे हित राखले जात नाही, असा त्यांचा प्रमुख मुद्दा होता. अल्पसंख्याक समुदाय म्हणून लंकेतील तामिळींबद्दल कुणालाही सहानुभूती वाटावी. लंकेत सिंहली ७४ टक्के आहेत. त्या तुलनेत प्राचीन काळापासून त्या बेटावर राहणारे तामिळ बरेच कमी. तरीही त्यांच्या स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न प्रभाकरनने पाहिले. स्वप्न पाहण्यात गैर नव्हते. परंतु, त्यासाठी लिट्टेने जो मार्ग पत्करला तो कोणतेच सरकार खपवून घेऊ शकले नसते. तरीही लंकेत ३० वर्षे ते खपवून घेतले गेले. प्रभाकरन अत्यंत निर्दयी होता. अत्यल्प शिकलेला आणि सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या प्रभाकरनने आत्मघातकी पथकांच्या माध्यमातून जगाला अनेक धक्के दिले. लिट्टेने किमान लाखभर तरी माणसे मारली असावीत, असा अंदाज आहे. त्यात जसे सिंहली होते, तसे तामिळही होते. राजीव गांधींसारखे भारतीयही होते. प्रभाकरनने कधीही आपल्या मागणीला तात्त्विक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, अल्पसंख्यकांची एक संघटना एका स्वतंत्र देशाच्या सरकारपुढे आव्हान उभे करू शकते, हे साऱ्या जगाने लिट्टेच्या निमित्ताने पाहिले. जगाने हेही पाहिले की, कोणत्याही अस्मितेच्या नावावर बहुसंख्याक समुदायाला वेठीस धरू पाहणाऱ्यांविरुद्ध सत्तेने निर्धारपूर्वक पावले उचलली की काय घडू शकते!
Wednesday, 20 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment