"पोलिसांचा दिशाहीन तपास '
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) ः राज्यभर गाजलेल्या २२ वर्षीय तनुजा नाईक खून प्रकरणात पकडण्यात आलेल्या संशयिताच्या विरोधात ठोस पुरावे तसेच पोलिसांनी व्यवस्थित तपास काम केला नसल्याचा ठपका ठेवून रजनीशसिंग ऊर्फ राजू आणि रामसिंग या दोघांना जलद न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद कामत यांनी आज दोषमुक्त केले. यावेळी पोलिसांच्या तपासकामावर न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. या खून प्रकरणाचा पोलिसांनी केलेल्या तपासकामात कोणत्याही प्रकारचे ताळतंत्र आढळून आले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
खुनाच्या तब्बल चार वर्षानंतर राजू ऊर्फ रजनी सिंग (२४) या संशयित आरोपीला फोंडा पोलिसांनी मालीम बेती येथून ७ सप्टेंबर २००६ रोजी अटक केली होती. तसेच त्याच्या विरोधात पुरावेही गोळा केले होते. या प्रकरणातील आणखी एक संशयित रामसिंग हा मध्यप्रदेश येथील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच खून करण्यासाठी वापरण्यात आलेला कट्टा व चोरून नेलेली सोनसाखळी जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता.
मयत तनुजा नाईक हिचा दि. १५ जुलै २००२ रोजी पारंपाय मडकई येथील आस्थापनांतून घरी परतत असताना दिवसाढवळ्या गोळ्या घालून तिचा खून करण्यात आला होता. संशयित आरोपी राजू हा मालीम बेती येथे पान मसाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. तनुजा ज्या फॅक्टरीत कामाला होती त्याच फॅक्टरीत राजू काम करीत होता. नंतर ते काम सोडून त्याने बेती येथे आपला स्वतःचा पानमसाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच्याविरुद्ध संशय व्यक्त करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याचप्रमाणे फोंडा येथील चॅपेलमध्ये झालेल्या चोरीतही त्याचा सहभाग असल्याची दावाही पोलिसांनी त्यावेळी केला होता. फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक मोहन नाईक आणि पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी यांनी या आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली होती.
सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशाने हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात होते. मात्र तनुजाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा मास्कोद, दोन कानातली रिंग्ज, अंगठी, डूल तसेच हातात असलेले घड्याळ आदी अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीच्या वस्तू सोडून पाच ते सहा हजार रुपये किमतीची फक्त गळ्यातील सोन्याची साखळीच त्यांनी का चोरली असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता. हा चोरीचा उद्देश नाही, तसेच पकडण्यात आलेले खुनी हे खरे खुनी नसल्याचा दावा त्यावेळी मडकई नागरिक कृती समितीने केला होता.
Saturday, 23 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment