पणजी, दि. १६ : गोव्यातील नामवंत रांगोळी कलाकार नीलेश नाईक यांनी साकारलेल्या सर्वांत मोठ्या रांगोळी प्रतिमेला "लिम्का व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ची मान्यता मिळाली आहे. गिनीज बुकच्या पुढील आवृत्तीत या विक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे.
यासंबंधी गिनीजच्या लंडन येथील कार्यालयातून पाठवण्यात आलेले पत्र नुकतेच नीलेश नाईक यांना प्राप्त झाले आहे. नीलेश नाईक यांनी मे २००८ साली मेरशी येथील मुरडा मैदानावर १८ दिवसांच्या अथक मेहनतीतून छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल ४९०० चौ.मी. ची भव्य रांगोळी प्रतिमा साकारली होती. सदर रांगोळी प्रतिमा आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी रांगोळी प्रतिमा ठरली असून नीलेश नाईक यांनी एकट्यानेच ही संपूर्ण रांगोळी साकारली हे विशेष.
सदर विश्वविक्रमाची नोंद लिम्का व गिनीज बुकमध्ये व्हावी यासाठी नीलेश नाईक यांनी मार्च २००७ मध्ये अर्ज केला होता. गिनीजच्या कार्यालयातून वेळोवेळी देण्यात आलेल्या आवश्यक अशा सर्व निर्देशांनुसार सदर विश्वविक्रम साकारला होता. हा विश्वविक्रम पूर्ण केल्यानंतर त्याविषयीची नीलेश नाईक यांनी पाठवलेल्या संपूर्ण माहितीचा अभ्यास करून गिनीजतर्फे या विक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र नीलेश नाईक यांना पाठवण्यात आले आहे. याविषयीचे प्रमाणपत्रही त्यांना लवकरच देण्यात येणार आहे.
नीलेश नाईक यांच्या या विश्वविक्रमी उपक्रमाला गोव्यातील जनतेने भरघोस प्रतिसाद दिला होता. मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, नामवंत गायिका हेमा सरदेसाई यांच्यासह गोव्यातील अनेक मान्यवर व्यक्तींनीही घटनास्थळी भेट देऊन नीलेश नाईक यांना प्रोत्साहन दिले होते.
"लिम्का व गिनीज'कडून मिळालेल्या मान्यतेविषयी आनंद व्यक्त करताना आपले अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया नीलेश नाईक यांनी व्यक्त केली. गोव्यातील जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार व्यक्त करताना जनतेच्या या प्रोत्साहनानेच प्रेरित होऊन यापुढे पाण्याखाली रांगोळी प्रतिमेचा विश्वविक्रम साकारणार असल्याचे नीलेश नाईक यांनी सांगितले.
Saturday, 17 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment