Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 13 January 2009

ताबा घेण्यास गाडेवाल्यांना पंधरा दिवसांची मुदत

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - शहरातील हटवण्यात आलेल्या गाडेवाल्यांना महापालिकेतर्फे आज नव्या बाजार संकुलात जागा वितरण करण्यासाठी बोलावण्यात आले असता बहुतांश गाडेेधारकांनी या गाडे वितरण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. गाडेधारकांच्या अनुपस्थितीत वितरित केलेले गाडे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने या गाडेधारकांना पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. या पंधरा दिवसात गाडे ताब्यात न घेतल्यास सध्या चालवत असलेल्या त्यांच्या गाड्यांची वीज जोडणी तोडली जाणार असल्याची माहिती पणजी महापालिकेचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी दिली. नव्या बाजार संकुलात आज केवळ चार गाडेवाल्यांनी ताबा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
गाड्यांचे वितरण केले जाणार असल्याची आम्हांला कोणतीही लेखी माहिती देण्यात आली नव्हती. देण्यात येणारे गाडे हे तळमजल्यावर असावे, ही आमची मागणी अद्याप कायम आहे. उद्या दि. १३ रोजी या विषयावर बैठक होणार असून त्यावेळी पुढील योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सिने नॅशनल जवळील गाडेधारकांनी दिली.
आज दुपारी १२ वाजता नव्या बाजार संकुलात "लॉटरी'द्वारे गाडे वितरित करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र काही तुरळक गाडेवाले सोडल्यास या ठिकाणी अन्य कोणीही उपस्थित राहिले नाही. यामुळे महापालिकेनेच या गाडेवाल्यांच्या नावांप्रमाणे त्यांचे गाडे निश्चित केले. "आम्ही त्यांच्या मागणीनुसारच गाडे दिले आहेत. तसेच गाडे वितरित केल्यानंतर पंधरा दिवसाची मुदत दिली जावी, अशीच त्यांची मागणी होती. अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्रही या गाडेवाल्यांनी १९९८ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केले होते' अशी माहिती यावेळी श्री. रॉड्रिगीस यांनी दिली.
पणजी शहरात १८० गाडे बेकायदेशीर असून ते त्वरित हटवले जावे, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ८८ गाडे हटवण्याचा आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानंतर गोविंदा बिल्डिंग येथील सहा गाडे, मिरामार येथील चार गाडे हटवण्यात आले होते. तसेच सिने नॅशनल येथील २५ गाडेवाल्यांनीही गाडे हटवण्याचा आदेश महापालिकेने दिले होते. परंतु, नव्या बाजार संकुलात तळमजल्यावर गाडे दिले जात नाही , तोपर्यंत येथून न हटण्याचा निर्धार या गाडेवाल्यांनी केला आहे. त्यामुळे गेल्या एका महिन्यापासून महापालिकेची कोंडी झाली आहे.
येत्या पंधरा दिवसात या गाडेवाल्यांनी आपले गाडे हटवले नसल्यास त्यांची वीज जोडणी तोडण्याचा इशारा आत महापालिकेने दिला आहे.

No comments: