पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): वास्कोतील डॉ. श्रीकांत वेरेकर खून प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी रायन फर्नांडिस याने या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. त्याबाबतच्या सुनावणीला आजपासून सुनावणीला सुरुवात झाली. या खटल्यातील दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवादासाठी दहा दिवसांचा कालावधी न्यायालयाकडून मागून घेतला आहे. हा खटला सुरू असताना शिक्षा झालेल्या आरोपींना सुनावणीवेळी उपस्थित राहण्याची अनुमती दिली जावी, अशी याचना आज आरोपीचे वकील ललित चारी यांनी केली. ती ग्राह्य धरून या प्रकरणातील चारही आरोपींना उद्या (गुरुवारी) सकाळी १०.३० वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनास देण्यात आले आहेत.
सध्या हे चारही आरोपी आग्वाद तुरुंगात शिक्षा बोगत आहेत. यातील मुख्य आरोपी रायन फर्नांडिस याला फाशीची शिक्षा तर अन्य तिघे आरोपी राजेंद्र सिंह, सचिन परब व फ्रान्सिस डिसा याना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी पी. मजमूदार व गोवा खंडपीठाचे न्या. एन ए. ब्रीटो यांच्या न्यायालयात हा खटला सुरू झाला असून यावेळी सरकारने पोलिसांची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी मुंबई येथील वरिष्ठ वकील अमित देसाई यांची नियुक्ती केली आहे. तर आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील ललित चारी युक्तिवाद करीत आहे. दि. १५ जून ०७ रोजी मडगाव येथील सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी रायन याला फाशीची शिक्षा सुनावली होती तर, त्याच्या अन्य साथीदारांना जन्मठेपेची.
वास्को येथील प्रसिद्ध डॉक्टर श्रीकांत वेरेकर यांचे दि. १७ जानेवारी ०५ रोजी भल्या पहाटे फिरायला गेले असता रस्त्यावरून अपहरण करून त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनामुळे संपूर्ण गोव्यात खळबळ माजली होती. त्यामुळे या आरोपींना कोणती शिक्षा होते, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. आरोपीने डॉ. वेरेकर यांचा खून करण्यासाठी अनेक लुप्त्या अवलंबल्या होत्या. सुरुवातीला त्याने दुधातून विष प्रयोग करून त्यांना ठार करण्याचे ठरवले होते. परंतु, त्यात अपयश आल्याने विषारी सर्पदंशाने हत्या करण्याचा विचार त्याने केला. त्यातही ते अयशस्वी झाल्याने शेवटी डॉ. वेरेकर यांचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
डॉ. वेरेकर यांच्या मुलीचे कुटुंबाविरुद्ध रायन फर्नांडिस याच्याशी लग्न झाल्याने दोघांमधे वाद निर्माण झाला होती. लग्नाच्या काही महिन्यातच रायन याने आपली पत्नी सौ. सारिका हिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केल्याने तिने शेवटी आपल्या वडिलांचे घर धरले. त्यामुळे रायन याने मुलाचा पाठलाग सोडण्यासाठी डॉ. वेरेकर यांच्याकडे पैशांची मागणी लावून धरली होती. ते पैसे देण्यास डॉ. वेरेकर तयार नसल्याने त्यांनी त्याचा काटा काढण्यासाठी खून केला होता.
Thursday, 15 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment