खलप यांची जोरदार मोर्चेबांधणी
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : उत्तर गोवा लोकसभेच्या जागेवरून सध्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस गोटात कमालीचे वादंग निर्माण झाले आहे. हा मतदारसंघ कॉंग्रेसनेच लढवावा अशी मागणी बहुसंख्य आमदार तथा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असताना आघाडीचा घटक या नात्याने ही जागा राष्ट्रवादीच लढवणार, असा हेका राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी चालवला आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना पुढे करून त्याबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना गळ घालण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या घोंगावू लागले असताना गोव्यातील राजकीय पक्षांनीही उमेदवार चाचपणीचे काम जोरात सुरू केले आहे. उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांची भाजप उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे. आता ही जागा लढवण्यावरून राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात मात्र बराच खल सुरू आहे. केंद्राप्रमाणे गोव्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असल्याने व या आघाडीचे सरकार सध्या राज्यात सत्तारूढ असल्याने जागावाटपानुसार उत्तर गोवा ही राष्ट्रवादीला देण्याचे यापूर्वी मान्य झाले आहे. उत्तर गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला टक्कर देऊ शकत नाही व या निवडणुकीत कॉंग्रेसचे चिन्ह नाहीसे झाल्यास त्याचा फटका भविष्यात कॉंग्रेसला बसेल असे मत व्यक्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कॉंग्रेसलाच मिळावी असा दबाव काही नेत्यांनी वरिष्ठांवर टाकल्याचीही खबर प्राप्त झाली आहे. डॉ. विल्फ्रेड डिसोझा वगळता राष्ट्रवादी पक्षाकडे एकही उमेदवार नाही. कॉंग्रेसच्या एखाद्या नेत्याला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा एक प्रस्ताव विचाराधीन असला तरी स्थानिक राष्ट्रवादी नेते मात्र त्यासाठी राजी नसल्याचा सूर आहे. दरम्यान, या प्रस्तावाला कॉंग्रेस पक्षातील एका बड्या गटाने तीव्र हरकत घेतली आहे. ही चाल म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची कृती ठरणार, तेव्हा उत्तर गोव्यात विधानसभा मतदारसंघात जर टिकून राहायचे असेल तर उत्तर गोवा लोकसभा निवडणूक कॉंग्रेसनेच लढवणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढवल्यास भाजपसाठी ती आयतीच संधी प्राप्त होणार, असा कयासही कॉंग्रेसमधील काही राजकीय जाणकारांनी वर्तविल्याने हा वाद गंभीर स्वरूप प्राप्त करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या गोव्यातील खासगी भेटीवेळी प्रदेश राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच लढवणार असा आभास निर्माण केला असला तरी त्याबाबत तडजोडीचा पर्याय शरद पवार यांनी खुला ठेवल्याचे कॉंग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसने एकवेळ विधानसभा मतदारसंघ वाटपात एक अतिरिक्त जागा राष्ट्रवादीच्या पदरात टाकण्याचीही तयारी दर्शवल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
ऍड.खलप आघाडीवर
उत्तर गोवा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तडजोड करून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याच्या शर्यतीत माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप आघाडीवर असल्याची चर्चा कॉंग्रेस गोटात सुरू आहे. दरम्यान, खलप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून ही जागा लढवावी असा प्रस्ताव सुरुवातीस पुढे करण्यात आला असला तरी त्यासाठी ऍड. खलप यांनी नकार दर्शवल्याची खात्रीलायक माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली. या जागेसाठी इच्छुक असलेल्यांत माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, विष्णू वाघ, प्रा.सुरेंद्र सिरसाट, निर्मला सावंत आदींची चर्चा असली तरी ऍड. खलप यांच्यासाठी कॉंग्रेसमधील अनेक नेते अनुकूल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ऍड. खलप यांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी चर्चा करून आपल्या उमेदवारीबाबत एकमत बनवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केल्याचेही सूत्रांकडून कळते. दरम्यान, पेडणे मतदारसंघ हा नव्या मतदारसंघ रचनेत राखीव बनल्याने मांद्रे मतदारसंघाची पुढील उमेदवारी जितेंद्र देशप्रभू यांना देण्यात यावी व उत्तर गोवा लोकसभा उमेदवारीचा आपला मार्ग मोकळा करावा असाही एक प्रस्ताव ठेवण्यात आल्याची खबर आहे. ऍड. खलप यांनी यासंबंधी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मगोचे सुदिन ढवळीकर यांच्याकडे चर्चा सुरू केली असून ते या प्रस्तावास अनुकूल असल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.
Monday, 12 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment