पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): सालेली सत्तरी येथील जमीनदारावर पृथ्वीराज कृष्णराव राणे यांच्यावर लाठ्या व लोखंडी सळयांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्या प्रकरणी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. न्यायाधीश उत्कर्ष व्ही. बाक्रे यांनी एकूण सहा आरोपी राजेंद्र केशव गावकर, तुकाराम रामचंद्र गावकर, सदाबाबी गावकर, विठ्ठल लक्ष्मण गावकर, रमेश झालगो गावकर व काशिनाथ देवेगो गावकर यांच्या विरुद्ध ही सुनावणी सुरू केली आहे. पुढील सुनावणी दि. २३ जानेवारी ०९ रोजी सत्र न्यायालयात होणार असून यावेळी फिर्यादी विश्वजित कृष्णराव राणे यांची साक्ष नोंदविली जाणार आहे.
दि. २८ डिसेंबर २००५ रोजी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान लाठ्या व लोखंडी सळयांनी पृथ्वीराज कृष्णराव राणे या जमीनदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यात ते जागीच ठार झाले होते. या घटनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. २७ डिसेंबर ०५ रोजी रात्री ८.१५ वाजता सालेली गावातील सुमारे पन्नास जणांच्या जमावाने कृष्णराव राणे यांच्या घरावर हल्ला चढवून घराची व तीन गाड्यांची नासधूस केली होती. त्यादिवशी विठ्ठल गावकर, सदा गावकर, उत्तम वासू गावकर, राजेंद्र गावकर यांनी गावकऱ्यांचे नेतृत्व केले होते, असे पोलिसांनी आपल्या आरोपपत्र म्हटले आहे. यावेळी सुनीताबाई राणे यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. या संदर्भात वाळपई पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दि. २८ रोजी पृथ्वीराज राणे आपल्या बोडणवाडा, सालेली येथील खडी क्रशरजवळ गेले असता आरोपींनी जमाव करून क्रशरच्या कार्यालयात त्यांच्यावर दगडफेक करून व त्यानंतर ठेचून त्यांना ठार मारले होते.
सुमारे महिनाभर हे प्रकरण धगधगत होते, सालेली गावातील वातावरण तंग झाले होते. संपूर्ण गोव्यातील राजकीय व सामाजिक जीवन या घटनेने ढवळून निघाले होते. यानंतर उसळलेल्या दंगलीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. श्री. राणे यांच्याकडून जमिनीचे मालकी हक्क नावावर करण्यास चालढकल होत असल्याच्या ईर्षेतून हे खून प्रकरण घडले. शासनातर्फे सरकारी वकील ऍड. सुभाष देसाई बाजू मांडत आहेत.
Friday, 16 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment