Tuesday, 13 January 2009
फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध राज्यात कारवाई सुरू
नागरी पुरवठा खात्याच्या अहवालावरून घोटाळ्यावर शिक्कामोर्तब
पणजी,दि. १२ (प्रतिनिधी) - राज्यात मोठ्या प्रमाणात केरोसीनचा काळाबाजार सुरू असल्याचा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा दावा पूर्णपणे खरा ठरला आहे. गेल्या काही विधानसभा अधिवेशनात हा विषय सातत्याने लावून धरल्यानंतर नागरी पुरवठामंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी चौकशीचे आदेश दिले होते. नागरी पुरवठा खात्याने तयार केलेल्या चौकशी आदेशात या काळ्याबाजाराचा पर्दाफाश झाल्याने आता "डॅमेज कंट्रोल'ला सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक केरोसीन वितरकाला कार्डधारकांच्या नावांची यादी पाठवण्याचे सक्त आदेश तालुका मामलेदारांतर्फे देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वेळोवेळी विधानसभा अधिवेशनात उघड केलेल्या घोटाळ्यांचा नंतरच्या काळात पर्दाफाश झाला आहे. "ब्रॉडबॅण्ड' योजनेचा "बॅण्ड' वाजवल्यानंतर सरकारला या योजनेत बदल करणे भाग पडले व कोट्यवधी रुपये वाचले. आता केरोसीन वितरणाच्या नावाखाली काळाबाजार सुरू असून तिथेही कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचा आरोपही सत्यात उतरला आहे. गरिबांना रोजगार मिळावा या मानवतावादी दृष्टिकोनातून आरंभ झालेल्या केरोसीन हातगाडेवाल्यांच्या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे नागरी पुरवठा खात्याने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या व्यवसायात गुंतलेले बहुतेक लोक हे राजकीय नेत्यांचे हस्तक आहेत व त्यांनी चालवलेल्या गैरकारभाराला सत्ताधारी नेत्यांकडून पांघरूण घालण्याचे प्रकार सुरू असल्याने नागरी पुरवठा खाते त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दरम्यान, खात्यानेच तयार केलेल्या या अहवालाद्वारे आता या काळ्याबाजाराचा पर्दाफाश झाल्याने सत्ताधारी नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
केरोसीनच्या काळ्याबाजारातून वार्षिक सुमारे २.५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची पर्रीकर यांनी केलेली टीका जवळजवळ खरी ठरली आहे. नागरी पुरवठा खात्याकडे नोंद असलेल्या सुमारे ७०० हातगाडेधारकांपैकी ४७० हातगाडेधारक बोगस असल्याचे उघड झाले आहे. या लोकांनी सादर केलेले पत्ते खोटे असून ते कोण आहेत याचा सुगावाच खात्याला लागत नसल्याची सद्य परिस्थिती आहे. केरोसीन हातगाडेवाल्यांसाठी खात्याकडे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने याचा गैरफायदा या लोकांनी बिनधास्तपणे घेतल्याचे या अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. हातगाडेवाल्यांच्या आकड्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यांच्याकडून नेमके केरोसीन कुणाला विकण्यात येते याचा माहितीही खात्याकडे उपलब्ध नाही, अशीच जणू परिस्थिती बनली आहे. सरकारे ठरवून दिलेल्या दरांची माहितीच नसलेल्या हातगाडेवाल्यांकडून आपल्या मर्जीप्रमाणे दर आकारले जात असून त्यांच्याकडे कार्डधारकही नसल्याचे उघडकीस आले आहे. केरोसीनवर मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी अनेक दुकानदार व विक्रेत्यांनीही हातगाडेवाल्यांच्या यादीत आपली नोंदणी करून घेतल्याची शक्यता खरी ठरल्याने त्यासंबंधी खात्याकडून नोटिसा पाठवण्याचे काम सुरू आहे.
हातगाडेवाल्यांना प्रतिलीटर १० रुपयाप्रमाणे केरोसीन दिले जाते. केरोसीन कार्डधारकांना देण्याचे बंधन असताना खुल्या बाजारात ते लोकांना प्रतिलीटर १७ ते ३५ रुपयांपर्यंत विकले जात असल्याचेही पाहणीत आढळून आले आहे.
खात्याने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे केवळ सासष्टीत ३१५ हातगाडेवाल्यांना परवाने देण्यात आले आहेत. तिसवाडीत १९६ तर मुरगावात ९६ हातगाड्यांची नोंद आहे. मडगावातच शेकडो परवाने देण्यात आल्याचेही उघड झाले आहे. दरमहा १८० लीटरप्रमाणे ७०० जणांना केरोसीनचा साठा देण्यात येतो. त्यात काही मोजक्या हातगाडीवाल्यांना २२० लीटर देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. दरम्यान, हा अहवाल सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरला असून पुढील अधिवेशनापूर्वी याबाबत ठोस कारवाई करण्याचे प्रयत्न नागरी पुरवठा खात्याकडून सुरू झाले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment