फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) : भक्ती ही मूळ शक्ती, प्राण असून भगवंताची प्राप्ती भक्तीतून होऊ शकते. भक्ती आणि भय एका ठिकाणी राहू शकत नाहीत. भक्ती करणाऱ्या मनुष्याला कशाची भीती वाटत नाही. भारत हा सुद्धा भक्ती करणाऱ्याचा देश आहे. मात्र, आज भक्तीचा विसर पडल्याने अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, असे प्रतिपादन राजस्थानातील पंच खंड पीठाचे पीठाधीश प.पू.आचार्य धर्मेंद्रजी महाराज यांनी तपोभूमी कुंडई येथे आज संध्याकाळी केले.
तपोभूमी कुंडई येथील श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या श्री गुरुमाऊली पावन धामाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित सद्गुरू भक्ती मेळाव्यात प.पू. आचार्य धर्मेंद्रजी बोलत होते. यावेळी तपोभूमीचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार नीळकंठ हर्ळणकर, आचार्य प्रसाद, सत्कारमूर्ती प.पू. पवन महाराज ऊर्फ प.ल. राऊत (पालघर) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गोवा ही पावन भूमी असून गोव्याला भोग भूमी बनवू नका. योगभूमी म्हणून गोव्याचा विकास केला पाहिजे, असे सांगून प.पू.आचार्य धर्मेंद्रजी म्हणाले की, आपल्याला मोठी धार्मिक-सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे. पद्मनाभ संप्रदायाच्या प्रत्येक अनुयायाने शेंडी आंदोलन सुरू केले पाहिजे. तसेच महिन्याला दोन नवीन शेंड्याची संप्रदायात भर घातली पाहिजे. महिलांनी सुद्धा पारंपरिक संस्कृतीचे योग्य आचरण केले पाहिजे. या गुरुपीठामुळे बहुजन समाजाचा उत्कर्ष झालेला आहे. हा उत्कर्ष विश्वव्यापी झाला पाहिजे, असेही स्वामींनी सांगितले.
कृतज्ञतेच्या भावनेने काम केल्यास जीवनात यश निश्चित प्राप्त होऊ शकते. परमेश्वराला घाबरण्याची गरज नाही. परमेश्वर वाईट गोष्ट करीत नाही. केवळ पाप मार्गातून वाईट गोष्टी घडत असतात. पाप हाच मनुष्याचा प्रमुख शत्रू आहे. अंधविश्र्वासाला बळी पडू नका, असे प.पू. आचार्य धर्मेंद्रजी यांनी सांगितले.
प.पू.ब्रह्मेशानंद स्वामी
प्रत्येक मनुष्याने कल्याणाचा विचार आत्मसात केल्यास कल्याणकारी समाज निर्माण होऊ शकतो. आपला समाज सनातन वैदिक संस्कृती निसर्गाशी सुसंगत आहे. निसर्गाला अनुसरून जीवन जगल्यास आपण सुखी होऊ शकतो. निसर्गानुरूप कार्यक्रमण केले तर सुख प्राप्त होऊ शकते. परमेश्र्वराला मान्य केले नाही, आचरण योग्य प्रकारे केले नाही तर सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, असे प.पू.ब्रह्मेशानंद स्वामी यांनी सांगितले.
आजचा समाज स्वतःचे अस्तित्व विसरल्याने संकटात सापडला आहे. ज्यांनी आपले अस्तित्व शाबूत ठेवले आहे तो विचारपूर्वक पावले उचलून सुखाकडे वाटचाल करीत आहे. आजची विदारक स्थिती बदलण्यासाठी मनुष्याने आत्मचिंतन केले पाहिजे. संघटित शक्तीला योग्य कृतीची जोड देण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीत गोमंतकातील समाज संघटित होत आहे, ही चांगली बाब आहे. कुणीही कमजोर नाही, बलहिन नाही. स्वतःला न्याहाळा, शक्तीचे दर्शन घडेल. आपल्या एकजुटीतून समाज, देश आणि संस्कृतीचे रक्षण करू शकतो. आत्मिक शक्ती वाढविण्यासाठी उपासना केली पाहिजे. निष्ठा, भाव, भक्ती, विश्र्वास यामुळे आत्म्याचा विकास होऊ शकते, असे ब्रह्मेशानंद स्वामी यांनी सांगितले.
या पद्मनाभ संप्रदायाने गोव्यातील बहुजन समाजाला ताठ मानेने उभा राहण्याचे बळ दिले आहे, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. या संप्रदायाला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसणार नाही, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. यावेळी आमदार पांडुरंग मडकईकर, प.पू. पवन महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात संप्रदायाच्या प्रार्थनेने झाली. संप्रदायाचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी स्वागत केले. सुदेश नाईक, नरेश फडते, प्रशांत मांद्रेकर, सुजन नाईक, रमेश फडते, महेश कांबळी, दिगंबर सावंत यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रकाश केदार यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्मानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संप्रदायाच्या बटूंनी वेद मंत्रघोष केला. यावेळी प.पू. पवन महाराज ऊर्फ प.ल. राऊत यांचा प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प.पू.आचार्य धर्मेंद्रजी यांच्या हस्ते संप्रदायाच्या प्रचारकांचा गौरव करण्यात आला. यात मधुकर केरकर, बिभीषण गुणाजी, विष्णू किनळेकर, गणेश लांबगावकर, गुरुदास गावकर, महेश आरोंदेकर, उमाकांत नार्वेकर, शशिकांत केरकर, लक्ष्मण कवळेकर, रामनाथ गावकर, यशवंत काणकोणकर, बुधो बाणावलीकर, गुरुदास नार्वेकर, श्रीराम गावस, चंद्रकांत पंचवाडकर, बाबली ढवळे, शंकर नाईक गजानन तोरस्कर, धनंजय वायंगणकर यांचा समावेश होता. तसेच काही प्रचारकांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. शेवटी सच्चिदानंद नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संगम भोसले यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment