"संपुआ' सरकार पणाला लावणार - राहुल गांधी
अमेठी, दि. 16 - अमेरिकेशी नागरी अणुकरार करण्याचा निर्णय देशहिताचा असून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या प्रगल्भ नेतृत्वाद्वारे ही बाब सिद्ध केली आहे. त्यामुळे सरकार पणाला लावण्याचा धोका पत्करण्यास कॉंग्रेस सज्ज आहे, असे प्रतिपादन कॉंगेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज अमेठी दौऱ्यादरम्यान केले.
राहुल गांधी म्हणाले, कोणत्याही महत्त्वाच्या घटनेचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन निर्णय घेतो तोच खरा नेता होय. अणुकराराचा निर्णय काहीसा असाच आहे. माझे वडील स्व. राजीव गांधी यांनी देशात वैज्ञानिक क्रांती घडवून आणण्याचे ठरवले तेव्हा त्या निर्णयालाही असाच विरोध झाला होता. तथापि, त्या निर्णयाचे परिणाम कसे झाले हे दशकानंतर पाहायला मिळाले आहेत. कॉम्प्युटर आणि टेलिकॉममुळे देशाचे चित्रच बदलले असून ते सर्वच क्षेत्रांसाठी लाभदायी ठरले आहे.
अणुकरारामुळे भविष्यात भारताला जागतिक शक्ती बनण्याचे बळ मिळू शकेल. याशिवाय विकास आणि ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीही हा करार महत्त्वपूर्ण आहे,''असे राहुल गांधी म्हणाले.
""अणुकरारावर पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मला गर्व आहे. करारावर त्यांनी जी हिंमत दाखविली आहे तसेच ज्या पद्धतीने ते सरकारचे नेतृत्व करीत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे. अणुकराराच्या मुद्यावरून सरकारला सत्तेवरून जावे लागले तरी मला त्याची चिंता वाटत नाही,''असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, नवी दिल्लीहून आलेल्या वृत्तानुसार तेलंगण राष्ट्र समितीने व एमडीएमकेचे नेते वायको यांनी संपुआ सरकारला पाठिंबा द्यायचा नाही, असे ठरवले आहे. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी योग्य वेळ येताच आपली भूमिका जाहीर करू, असे जाहीर केले आहे. त्यामुळे एक-एक खासदार मिळवण्यासाठी कॉंग्रेसला तारेवरील कसरत करावी लागत आहे. जसजसा विश्वासदर्शक ठरावाचा दिवस जवळ येत चालला आहे, तसतशी सरकारच्या पायाखालील वाळू घसरत चालल्याचे दिसून येते, असे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
Wednesday, 16 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment