Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 18 July 2008

परवड एका वृद्धेची

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) : वृद्ध आईला घरातून बाहेर काढून प्रसाधनगृहात राहण्यास भाग पाडणाऱ्या मुलाच्या विरोधात आज पणजी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलिस सध्या त्याच्या शोधात आहे. श्रीमती दीप्ती नवसो सावळ या (८२) वर्षीय वृद्ध आईला घराबाहेर काढल्याप्रकरणी "हेल्पेज' या संस्थेच्या मदतीने भानुदास सावळ याने ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन मोठा भाऊ अरुण सावळ (५८) याच्याविरुद्ध पोलिसांनी पालक देखभाल व कल्याण आणि ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ च्या २५ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मळा पणजी येथील अरुण सावळ याने दोन महिन्यापूर्वी श्रीमती सावळ यांना घराबाहेर काढले. नंतर काही दिवस त्यांना शेजाऱ्यांनी आसरा दिला. शेजारच्यांच्या वऱ्हांड्यात काही दिवस राहिल्यावर त्यांना तेथूनही हाकलून लावण्यात आले. त्यामुळे मांडवी पुलाखालील प्रसाधनगृहात कामाला असलेल्या त्यांच्या लहान मुलाने त्यांना तेथे नेऊन ठेवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तेथे तापाने फणफणत असलेल्या अवस्थेत त्यांना एका ओळखीच्या नगरसेवकाने पाहिले. या नगरसेवकाने त्यांना पोलिसांच्या मदतीने "गोमेकॉ'त दाखल केले. तथापि, सोबत कोणीही राहायला नसल्याने त्यांना तेथून घरी पाठवण्यात आले. राहायला घर नसल्याने अखेर त्या नगरसेवकाने त्यांना मणिपाल या खाजगी इस्पितळात दाखल केले होते. याची माहिती "हेल्पेज' संस्थेला मिळाल्यानंतर त्यांनी भानुदास या त्यांच्या मुलाच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास संबंधिताला तीन महिन्यांची कैद व दंड देण्याची तरतूद आहे. या विषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करीत आहे.

No comments: