Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 July 2008

"पक्षाशी सुसंगत भूमिका घ्या!'

सोमनाथदांना बसूंचा सल्ला
कोलकाता, दि.13 - ""अणुकराराच्या मुद्यावरून पक्षाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी सुसंगत अशीच भूमिका तुम्ही घ्या व त्यानुसार निर्णय घ्या,'असा सल्ला माकपाचे सर्वात ज्येष्ठ नेते व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांना दिला आहे. ज्योती बसू यांची सोमनाथदांनी त्यांच्या "सॉल्ट लेक' या निवासस्थानी भेट घेतली. उभय नेत्यांच्या या भेटीत दीर्घ चर्चा झाली. या भेटीतच बसूंनी सोमनाथदांना पक्षाच्या भूमिकेशी एकरूप राहण्याचा सल्ला दिेला आहे.
केंद्रातील कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकार येत्या 22 जुलै रोजी संसदेत बहुमत सिद्ध करून दाखविणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाब वाढत आहे. "राजीनामा देणार नाही,'असे सोमनाथदांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. पण, माकपाला मात्र त्यांचा राजीनामा हवा आहे. पक्षात म्हणजेच माकपामध्ये सोमनाथदांना राजीनाम्याचा स्पष्ट आदेश देण्याची हिंमत नाही. त्यामुळेच त्यांनी पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांच्यावर सोमनाथदांची राजीनामा देण्यासाठी समजूत काढण्याची कामगिरी सोपविली होती. त्यानुसार बसूंनी सोमनाथदांना आपल्या घरी बोलाविले. उभय नेत्यांची ही भेट 50 मिनिटे चालली. पक्षाची भूमिका बसूंनी सोमनाथदांसमोर मांडली व पक्षाशी सुसंगत भूमिका घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
या भेटीनंतर सोमनाथदांनी बाहेर उभे असलेल्या पत्रकारांशी न बोलणेच पसंत केले. ज्योती बसू देखील काय घडले हे सांगण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
केंद्रातील डाव्या आघाडीने संपुआचा पाठिंबा काढून घेतला आहे. पाठिंबा काढून घेणाऱ्या डाव्या पक्षांच्या खासदारांच्या यादीत सोमनाथदांचेही नाव आहे. या यादीत आपले नाव का टाकले, असा आक्षेप सोमनाथदांनी घेतला आहे.

No comments: