Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 15 July 2008

कॉंग्रेसची धावाधाव समर्थकांची संख्या २५०?

नवी दिल्ली, दि. १५ : येत्या मंगळवारी लोकसभेत होणाऱ्या शक्तिपरीक्षणात कॉंग्रेसप्रणित "संपुआ' सरकारला २७२ चा जादुई आकडा ओलांडणे शक्य नसल्याचे दिसत असून, आज अकाली दलाने आपण सरकारविरोधात मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कॉंग्रेसची उरलीसुरली आशाही मावळली आहे. हे सरकार निश्चितपणे कोसळणार असा दावा डाव्या पक्षांनी केला असून आपण भाजपसमवेत सरकारविरोधी मतदान करण्यात काहीच गैर नसल्याचे म्हटले आहे. विद्यमान सरकारला २५० सदस्यांचाही पाठिंबा मिळणे अशक्य असल्याचे भाजपने म्हटले आहे. सद्दस्थितीत आवश्यक बहुमत सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांची धावाधाव सुरू असून, सुमारे २५ जण असलेल्या अपक्ष व छोट्या पक्षांच्या भरवशावर हा पक्ष आता आपले भवितव्य अजमावणार आहे.
येत्या २२ जुलै रोजी लोकसभेत होणाऱ्या शक्तिपरीक्षणात कॉंगे्रस नेतृत्वाखालील संपुआ सरकारला २५० खासदारांचेही समर्थन मिळणे अशक्य दिसत असून आता या सरकारचे पतन अटळ आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते विजयकुमार मल्होत्रा यांनी आज येथे केला.
मनमोहनसिंग सरकारला आपले बहुमत सिध्द करू न दाखविण्यासाठी ५४५ सदस्यांच्या सभागृहात २७२ मतांची आवश्यकता आहे, याकडे लक्ष वेधून मलहोत्रा यांनी सुचविले की, ज्या पाच खासदारांवर खटले चालू आहेत व जे गुन्ह्यांखाली कारागृहात बंदिस्त आहेत त्यांना मतदान करण्याची अनुमती देण्यात येऊ नये.
काही लहान लहान पक्ष एवढेच नाही तर लोकसभेतील कॉंगे्रसचे काही खासदार भाजपाच्या सतत संपर्कात असून अणुकराराच्या मुद्यावर सरकारविरोधात मतदान करण्यास ते तयार आहेत, याकडे मलहोत्रा यांनी लक्ष वेधले. मलहोत्रा हे भाजपाचे लोकसभेतील उपनेते आहेत. अणुकराराच्या विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षांची नावे तसेच कराराच्या विरोधात असलेल्या कॉंगे्रस खासदारांची नावे सांगा असे म्हटले असता त्यांनी यावर अधिक काही सांगण्यास नकार दिला.
रालोआ एकसंघ असून रालोआच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या येथे बैठक आमंत्रित करण्यात आली असून त्यात पुढील राजकारणावर विचारविनिमय केला जाणार आहे. या बैठकीनंतर रालोआच्या घटकपक्षांची बैठक विरोधीपक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी बोलाविण्यात आली आहे. रालोआच्या तसेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांची सध्या दररोज बैठक होत असून त्यात देशातील राजकीय स्थितीचाही आढावा घेतला जात असतो, याकडे मलहोत्रा यांनी लक्ष वेधले. आज दुपारी मलहोत्रा येेथे पत्रकारांशी बोलत होेते.
याचवेळी पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले की, भारत व अमेरिका यांच्यात जो नागरी अणुऊर्जा करार झाला आहे तो जशाचा तसा आम्हाला मान्य नाही. देशहिताकडे बघता आमच्या पक्षाने तसेच रालोआतील सर्व घटकपक्षांनीही त्याला विरोध केला आहे. अमेरिकेबरोबरच्या मैत्री संबंधांना आमचा मुळीच विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अणुकरारावरून भाजपाने जी भूमिका घेतली आहे त्याचा चुकीचा अर्थ काढून लोकांना भ्रमित केले जात आहे. अणुकरार सध्या ज्या स्थितीत त्याला आमचा विरोध आहे कारण की तो देशहिताच्या विरोधात आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
अकाली दलाचा विरोध कायम
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) घटक पक्ष असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने संसदेत २२ जुलै रोजी होणाऱ्या विश्वासमतादरम्यान संपुआ सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकाली दलाने स्पष्टपणे म्हटले आहे की, देशाच्या पंतप्रधानपदी एक शीख व्यक्ती असली तरी आम्ही संपुआला मत देणार नाही. लोकसभेत अकाली दलाचे आठ खासदार आहेत. आता त्यांचीही मते विरोधात पडणार असल्याने संपुआ सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सने आपले नेते ओमर अब्दुल्ला यांना अणुकराराविषयी पाठिंबा देण्याच्या किंवा न देण्याच्या निर्णयाचे सर्वाधिकार सोपविले आहेत. यापूर्वी त्यांनी वैयक्तिक स्वरूपात विचार केला तर आपला या कराराला विरोध असल्याचे म्हटले होते. आता प्रत्यक्ष मतदानात ते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ते या मतदानापासून दूर राहण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

जादुई आकडा कसा गाठणार?
देशातील सर्व राजकीय पक्ष सध्या आकड्यांचा खेळ खेळत असून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा डाव्या पक्षांनी काढून घेतल्यावर सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आता संपुआला २७२ च्या जादुई आकड्याला पार करावे लागणार आहे. यासाठी लहानसहान पक्षांसोबत अपक्ष खासदारांची जुळवाजुळव सुरू असून कॉंग्रेस २७२ ची जादुई संख्या गाठणार की नाही अशी चर्चा सुरू आहे.
भारत अमेरिका अणु कराराचे समर्थन करणारे, विरोध करणारे आणि अद्याप तळ्यात की मळ्यात याचा निर्णय न घेतलेले पक्ष पुढीलप्रमाणे

अणुकराराचे समर्थन करणारे पक्ष
कॉंग्रेस - १५३
समाजवादी पक्ष - ३९
राष्ट्रीय जनता दल - २४
द्रविड मुनेत्रा कझगम -१६
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष - ११
लोक जनशक्ती पार्टी - ४
मारुमलार्ची द्रविड मुनेत्रा कझगम - २
इंडियन युनियन मुस्लिम लीग - १
रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - १
* एकूण २५१
केरळ कॉंग्रेसच्या एका सदस्याला लोकसभेत मतदान करण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. मारुमलार्ची द्रविड मुनेत्रा कझगमच्या २ खासदारांनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे ठरवले आहे. याशिवाय दोन इतर खासदारांनी अद्याप आपला निर्णय घेतलेला नाही.

अणुकराराच्या विरोधात असलेले पक्ष
भारतीय जनता पक्ष - १३०
कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) - ४३
बहुजन समाज पक्ष - १७
शिवसेना - १२
बीजू जनता दल - ११
कम्युनिस्ट पक्ष (भारतीय) - १०
जनता दल (यु) - ८
शिरोमणी अकाली दल - ८
तेलगु देसम पक्ष - ५
फॉरवॉर्ड ब्लॉक - ३
राष्ट्रीय लोक दल - ३
तेलंगाना राष्ट्र समिती - ३
रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टी - ३
मारुमलर्ची द्रविड मुनेत्रा कझगम - २
आसाम गण परिषद - २
नॅशनल कॉन्फरन्स - २
केरळ कॉंग्रेस - १
नागालॅंड पीपल्स फ्रंट -१
जनता दल (से) - १
त्रिणमुल कॉंग्रेस - १
* एकूण २६६ खासदार

अनिश्चित

अपक्ष - ६
पत्तली मक्कल कटची - ६
झारखंड मुक्ती मोर्चा - ५
जनता दल (से) - २
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुस्लिमीन - १
पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी - १
मिझो नॅशनल फ्रंट - १
नॅशनल लोकतांत्रिक पार्टी - १
सिक्कीम डेमोक्रेटीक पार्टी - १
* एकूण २५ खासदार

-----------------------------------------------------------------------------
राजीनामा देणार नाही : चॅटर्जी
नवी दिल्ली, दि.१५ : अणुकराराच्या मुद्यावर डाव्या पक्षांच्या आघाडीने केंद्रातील "संपुआ' सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी माकपा नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार दबाब आणला जात असला तरी, २२ जुलैपर्यंत लोकसभा सभापतिपदी राहण्याची इच्छा सोमनाथदा यांनी व्यक्त केली आहे.
माकपा सरचिटणीस प्रकाश कारत यांना लिहिलेल्या पत्रात सोमनाथ चॅटर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार देत म्हटले आहे की, २२ जुलैपर्यंत राजीनामा देण्याची आपली इच्छा नाही. सभापती पदाचा राजीनामा देण्यासाठी जर माझ्यावर दबाव टाकला जात असेल तर आपण खासदारकीचाही राजीनामा देऊ.
आज संध्याकाळी सोमनाथदा सरचिटणीस प्रकाश कारत यांची भेट घेणार असून या भेटीत जर सोमनाथदा यांचा विचार बदलला तर ते राजीनामा देतील अन्यथा २२ पूर्वी ते राजीनामा देणार नाहीत, हे निश्चित.
-------------------------------------------------------------------------------

No comments: