Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 16 July 2008

जुवारी पुलाचा कठडा कोसळला

मोटारीची धडक; चालक किरकोळ जखमी
वास्को, दि. 16 (प्रतिनिधी) - मडगावहून पणजीला निघालेल्या "मारुती स्विफ्ट'चे चाक फुटल्यामुळे ती जुवारी पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यामुळे पुलाच्या संरक्षण कठड्याचा सुमारे सहा मीटर भाग तुटून कोसळला. दीड महिन्यापूर्वी अशाच स्वरूपाचा अपघात होऊन पुलाच्या कठड्याच्या दुसऱ्या बाजूचा काही भाग कोसळला होता. तो भाग अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतानाच या पुलाला हा दुसरा दणका बसला आहे.
आज सकाळी साडेसातच्या सुमारास जीए 03 सी. 1577 या क्रमांकाची मोटार जुवारी पुलावर पोहोचल्यानंतर तिचे चाक फुटले. त्यामुळे गाडी दिशा बदलून तेथील पदपथावर चढली व तिने संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली. त्याचवेळी अवधान राखून मोटारीचे चालक संतोष विष्णू कुंकळकर (वय 30) यांनी स्टीअरिंग झटपट फिरवले. त्यामुळे मोटार खाली कोसळली नाही. या अपघाताची माहिती मिळताच वेर्णा पोलिस तेथे दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. या अपघातात चालक संतोष यांना किरकोळ दुखापत झाली.
अपघातामुळे पुलाचा कठडा मोडल्याचे वृत्त समजताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता ए. डी. नागरची यांनी तेथे जाऊन पुलाची पाहणी केली. या अपघातामुळे पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जेथे अपघात झाला तेथे काठ्या बांधण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे पुलाचे सुमारे पंधरा हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वेळी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
पुलाची मोडतोड झालेल्या भागाची दुरुस्ती अजूनही झालेली नाही याकडे लक्ष वेधले असता येत्या पंधरा दिवसांत ती केली जाईल, असे नागरची यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक रापोझ नालास्को याप्रकरणी तपास करत आहेत.

No comments: