नवी दिल्ली, दि.१५ : सरकारचे समर्थन काढून घेतले तरी सल्ला देण्याची आपली जबाबदारी पार पाडताना डाव्या पक्षांनी पंतप्रधान कार्यालयाला उद्योग जगतातील वादांपासून दूर राहण्यास सुचविले आहे. काल मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, त्या पार्श्वभूमीवर माकपने आज हे वक्तव्य जारी केले.
मार्क्सवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरोने म्हटले आहे की, अणुकराराला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने उद्योग जगतातील काही लोक राजकीय खेळीच्या माध्यमातून आपआपली पोळी शेकण्याच्या विचारात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पंतप्रधान कार्यालयाने बळी पडू नये. स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उद्योग जगतातील वादांपासून दूर राहिले पाहिजे. सत्ता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात सरकार असले तरी त्यासाठी वाट्टेल त्या गोष्टींबाबत तडजोड केली जाऊ नये.
अंबानी बंधूंचे नाव न घेता माकपने म्हटले आहे की, अणुकराराच्या माध्यमातून आता उद्योग जगतातील काही "लॉबी' सक्रिय झाल्या आहेत. या कराराच्या अनुषंगाने काही फायदा पदरात पाडून घेता येईल का, या विचारात त्या आहेत. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. पंतप्रधानांनी या वादात पडून आपल्या कार्यालयाला औद्योगिक युद्धाचा आखाडा करू नये, असेही या वक्तव्यात म्हटले आहे.
एकमेकांचे पाय ओढण्याची अंबानी बंधूंची स्पर्धा साऱ्यांनाच माहिती आहे. समाजवादी पार्टीने सरकारला पाठिंबा देतानाच अनिल अंबानी यांच्या समूहाविषयी काही मागण्या रेटल्या होत्या. काल मुकेश अंबानी यांनी प्रत्यक्ष पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन स्वत:च्या हिताचे काही मुद्दे समोर आणले.
Tuesday, 15 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment