नवी दिल्ली, दि. १८ : समाजवादी पक्षाच्या नऊ लोकसभा खासदारांनी आज पक्ष बैठकीवर टाकलेला बहिष्कार, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आण्विक करारावर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह व झारखंड मुुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांनी घेतलेली सरकार विरोधाची ठाम भूमिका व उत्तर प्रदेशातील काही कॉंग्रेस खासदारांनी केलेली टीका यामुळे मनमोहनसिंग सरकार गंभीर संकटात आल्यासारखे दिसत आहे.
समाजवादी पक्षाच्या सात खासदारांनी बंडखोरी केल्याचे यापूर्वीच मानले जात होते. आज त्या संख्येत वाढ होत नऊ खासदारांनी संसदीय पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याचे दिसून आले. एका सूत्रानुसार ही संख्या आणखी दोनने वाढण्याची शक्यता आहे.
बसप नेत्या व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी समाजवादी पक्ष फोडण्याचे जोरदार प्रयत्न चालविले असून याकामी त्यांना रिलायन्सचे मुकेश अंबानी यांची भरपूर मदत होत असल्याचे समजते. मुकेश अंबानी हे सोनिया गांधींच्या जवळचे मानले जातात. पण, कॉंग्रेसने सपाचा पाठिंबा घेतल्यापासून मुकेश अंबानी नाराज असल्याचे कळते. समाजवादी पक्षात विभाजन घडवून आणण्याचे सारे प्रयत्न ते करीत असल्याचे एका सूत्राने सांगितले.
पूर्ण विश्वास
लोकसभेत आमच्या विजयाबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. २९० मते मिळवून विश्वास मताचा प्रस्ताव आम्ही जिंकू या शब्दात कॉंग्रेस प्रवक्ते वीरप्पा मोईली यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
झारखंड मुक्ती मोर्चा
झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन व राष्ट्रीय लोक दलाचे अजितसिंग यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल असे वातावरण दुपारपर्यंत असताना सायंकाळी मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्याचा निर्णय कॉंगे्रस नेतृत्वाने घेतला. शिबू सोरेन यांनी केंद्रात कोळसा मंत्रालय मागितले होते. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने सोरेन यांची मागणी मान्य होण्याची शक्यता मावळली आहे.
देवेगौडांची भूमिका
माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आज आण्विक करारावर सरकार फार घाई करत असल्याचे सांगून आपण सरकारच्या विरोधात जाऊ शकतो याचा संकेत दिला. त्यानंतर लगेच पंतप्रधानांनी त्यांच्याशी बंगलोरमध्ये संपर्क साधून चर्चा केली. एका सूत्रानुसार, देवेगौडा यांनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आश्वासन भाजपला दिले आहे. एका राज्यसभा सदस्यामार्फत देवेगौडांशी संपर्क साधला जात होता. देवेगौडांच्या पक्षाचे अन्य दोन खासदार वीरेंद्रकुमार व शिवण्णा हे पूर्वीपासूनच भाजपच्या संपर्कात आहेत. कर्नाटकातील आणखी एक कॉंगेे्रस खासदार आर.एल. जालप्पा यांनीही सरकारच्या विरोधात मतदान करण्याची घोषणा केली आहे. जालप्पा यांचे सुपुत्र भाजप मंत्रिमंडळात मंत्री आहेत.
भजनलाल फॅक्टर
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे सुपुत्र कुलदीप बिष्णोई यांनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याची घोषणा केली आहे. आज कॉंग्रेसचे आणखी एक खासदार अविनाश शर्मा यांनी बंडखोरीची घोषणा केली. ते भजनलाल गटाचे मानले जातात. आसामच्या बारपेटा मतदारसंघातील एका मुस्लिम खासदाराने सरकारच्या विरोधात मतदान करण्याची घोषणा केली आहे.
भाजपची चिंता
आपल्या काही खासदारांची प्रकृती ठीक नसणे ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरत आहे. बिकानेरचे खासदार धर्मेंद्र यांच्या गुडघ्यांवर अमेरिकेत शल्यक्रिया झाली असल्याने ते मतदानासाठी येण्याच्या स्थितीत नाहीत असे समजते. त्याचप्रमाणे गुजरातमधील खासदार महेश कनोडिया यांच्यावर बायपास शल्यक्रिया झाली असल्याने ते रुग्णालयात आहेत. मात्र त्यांना विशेष विमानाने आणण्याची व्यवस्था केली जात आहे.
------------------------------------------------------------------------------
अणुकराराला आता कॉंग्रेसमधूनच विरोध
संपुआ सरकार वाचविण्यासाठी अगदी किरकोळ पक्षांचे दार ठोठावणाऱ्या कॉंगे्रसमध्येच आज अणुकराराच्या विरोधात सूर निघाला आहे. कॉंगे्रसचे कर्नालमधील खासदार अरविंद शर्मा यांनी अणुकराराला जाहीर विरोध करून, उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचे गुण गायले आहेत.
मायावती यांच्या सरकारवर दबाव आणण्यासाठी आणि मायावती यांना अडचणीत आणण्यासाठी कॉंगे्रस नेतृत्वाने मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीशी अभद्र युती केली आहे. मुलायमसिंग आणि अमरसिंग यांची ज्या पद्धतीने कॉंगे्रसने मदत घेतली त्यामुळे मी खिन्न झालो आहे. कॉंगे्रसमध्ये राजकीय नैतिकतेचा दर्जा खालावत असल्याचेच हे संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
याउलट, मायावती सर्व समाजला एकत्र करण्यासाठी संघर्ष करीत आहेत, असे सांगताना शर्मा यांनी मायावती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आपण मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीत जाणार काय, असे विचारले असता, "माझा तसा कुठलाही विचार नाही. मी मायावती यांची स्तुती केली कारण, त्या पात्र अशाच नेत्या आहेत,' असे ते म्हणाले.
.........................................................................
Friday, 18 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment