नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे बांधकाम परवाने रद्द होणार
पणजी, दि. 14 (प्रतिनिधी) - राज्यात मलेरियाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत सहा जणांचा मृत्यू मलेरियामुळे झाल्याने सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे व कामगारांच्या बाबतीत हयगय करणाऱ्यांचे बांधकाम परवाने रद्द करण्याचा विचार सरकारने चालवला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज पणजी,ताळगाव,करंझाळे आणि सांताक्रूझ भागांतील वाढत्या मलेरिया प्रकरणांची गंभीर दखल घेऊनमहत्त्वाची बैठक पर्वरी येथे आयोजिली होती. बैठकीस पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, आरोग्य सचिव आनंद प्रकाश, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन,आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, नगरसेवक, पंच व अधिकारी हजर होते.
मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका,पंचायत व नागरिकांनी आरोग्य खात्याला सहकार्य करण्याची गरज आहे. याबाबतील बिगर सरकारी संस्थांची मदत घेऊन मोठ्या प्रमाणात जागृती झाली पाहिजे. हे काम ताबडतोब हाती घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.
राज्यात प्रामुख्याने पणजी व आजूबाजूच्या ठिकाणी बांधकामे वाढल्याने तेथे मलेरियाच्या डासांची पैदास वाढत चालली आहे. बांधकाम कंत्राटदारांनी कामगारांची आरोग्य कार्डे तयार केली असली तरी त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा व इतर सुविधा देण्यात येत नसल्याने या लोकांत मलेरियाची लागण झपाट्याने होत असल्याचे पाहणीत आढळले आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक तथा मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. दीपक काबाडी यांनी मलेरियाबाबत सादरीकरण करून उपस्थितांना या रोगासंबंधी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांची याप्रकरणी महत्त्वाची भूमिका असून त्यांनी आपल्या क्षेत्रातील अशा प्रकरणांकडे जातीने लक्ष देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या रोगाबाबत घ्यायच्या काळजीबाबत जर हयगय होत असेल तर बांधकाम परवानाही रद्द करण्याची तयारी आरोग्य खात्याने ठेवली असून येत्या काही दिवसांत त्यासंबंधी कडक धोरण अवलंबिले जाईल,असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
पणजी,सांताक्रूझ, ताळगाव आदी भागांत आरोग्य,पालिका,पंचायत तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर या संपूर्ण भागाची पाहणी करून अशी मलेरियाप्रवण ठिकाणे निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत विचार करण्यासाठी उद्या (मंगळवारी) खास बैठक बोलावण्यात येणार असून त्यात हा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ. दीपक काबाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते जून याकाळात राज्यात 4025 मलेरिया प्रकरणे आढळली. त्यात 1204 फाल्सीफेरमची होती. याकाळात एकूण 1,70,889 लोकांची रक्त तपासणी करण्यात आली होती. मलेरियाची लागण झालेल्या 4025 प्रकरणांपैकी 3497 लोक हे स्थलांतरित कामगार होते.
Monday, 14 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment