मडगाव, दि. 14 (प्रतिनिधी) - कोलवा समुद्रात आज तरंगणाऱ्या पत्र्यांच्या तीन पेट्या मिळाल्यामुळे व त्यांत स्फोटके असल्याच्या संशयाने खळबळ माजली. तथापि, शेवटपर्यंत त्यांचा उलगडा झाला नाही. अखेर हे कोडे सोडवण्यासाठी पणजीहून बॉंब निकामी करणाऱ्या पथकाला बोलावून त्या त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या.
सायंकाळी 4-30 वा. च्या सुमारास पाण्यावर तरंगत असलेल्या या पेट्या पाहून अनेकांची उत्सुकता चाळवली. मात्र पेट्या पत्र्याच्या असल्याचे व त्यावर काही खुणा केल्याचे पाहून ती स्फोटके वगैरे असली तर नसते लफडे नको म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. लगेच पणजीहून श्र्वानपथकाला पाचारण करण्यात आले. हे पथक सायंकाळी उशीरा दाखल झाले व त्याने पेट्यांत स्फोटके नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर त्या पेट्या वर काढण्यात आल्या असता त्यावर "एव्हीएशन' असे इंग्रजीत लिहिल्याचे आढळले. त्यावरून त्या विमानविषयक साहित्याच्या वापरातील असतील असा कयास व्यक्त केला जात आहे. समुद्रातून त्या लाटांबरोबर किनाऱ्यावर आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मडगावात मोती डोंगरावर सापडलेल्या शस्त्रसाठ्यामुळे गोवेकर आता प्रत्येक अनोळखी वस्तूकडे संशयाने पाहू लागले आहेत हेच या घटनेवरून दिसून आले.
Monday, 14 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment