Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 14 July 2008

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे निधन

मुंबई, दि.14 - देशाचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड यांचे आज पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षण प्रसारक मंडळी, भारतीय विधी संस्था यासह अनेक संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. चंद्रचूड यांचा जन्म 12 जुलै 1920 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. तिथून पुढे 1940 मध्ये मुंबईतील एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे विशेष अभ्यास विषय होते. पहिल्यापासूनच त्यांना विधी शाखेची आवड असल्याने पदवी शिक्षणानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात विधी शाखेत प्रवेश घेतला. 1942 मध्ये मुंबई विद्यापीठात विधी शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे ते एकमेव विद्यार्थी ठरले होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशी मोठमोठी पदे त्यांनी भूषविली. 1978 मध्ये सरन्यायाधीश म्हणून नियुुक्त झाले. ब्रिटन, अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या आमंत्रणावरून ते तेथे जाऊन आले होते. तेथील विविध विद्यापीठांमध्ये त्यांनी विधी विषयावर व्याख्याने दिली. सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी केंद्र सरकारशी संबंधित विविध प्रकरणांवर निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. न्या. स्पेन्सर पुरस्काराने सन्मानित यशवंत चंद्रचूड यांच्या निधनाबद्दल विधी वर्तुळात तीव्र संवेदना व्यक्त होत आहे.
आणिबाणीच्या काळात गाजले
"हेबिअस कॉर्पस'
1
978 ते 1985 या काळात सरन्यायाधीश राहिलेल्या यशवंत चंद्रचूड यांनी आणिबाणीच्या काळात गाजलेल्या "हेबिअस कॉर्पस' याविषयीच्या खटल्याचा निकाल इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या बाजूने दिला होता. आणिबाणीच्या काळात "मिसा'बंदींचा हॅबिअस कॉर्पस दाखल करण्याचा अधिकारही निलंबित करण्यात आला होता. त्यावेळी न्या. चंद्रचूड यांच्यासह चार न्यायाधीशांनी ते निलंबन योग्य ठरविले होते. फक्त न्या. एच. आर. खन्ना यांनी विरोधी मत नोंदविले होते. देशाच्या घटनात्मक इतिहासात त्यांच्या नावावर या निकालसह अनेक गाजलेल्या खटल्यांच्या नोंदी आहेत.

No comments: