Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 1 January 2011

विधिमंडळ गटनेते पदी मिकींची नेमणूक करा


राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींचे सभापतींना पत्र



पणजी दि. ३१ (प्रतिनिधी)
जुझे फिलिप यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवून मिकी पाशेको यांची त्या पदावर त्वरित नेमणूक करण्याची मागणी करणारे पत्र सभापतींना पाठवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच आगामी वर्षात होऊ घातलेल्या उलथापालथींची झलक दाखवली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनाही पक्षाच्या मुख्य प्रतोद पदावरून हटवण्यात यावे, असेही या पत्रात नमूद केले गेले आहे.
इतके दिवस कॉंग्रेस पक्षाचे ‘हो हो, नाही नाही’ खपवून घेणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच आक्रमक भूमिका घेण्याचा संकल्प सोडला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी सभापती प्रतापसिंह राणे यांना वरील आशयाचे पत्र पाठवले असून चेंडू त्यांच्या गोटात फेकला आहे. त्यामुळे आता यासंदर्भात सभापती कोणता निर्णय घेतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. सभापतींच्या निर्णयावरच गोव्यातील राजकारणाची पुढील दिशा अवलंबून असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या पत्राच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाशी साटेलोटे जमवून आपल्याच पक्षश्रेष्ठींना आव्हान देणार्‍या जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांना पक्षातून हाकलण्याची सर्व सिद्धता पक्षाने केल्याचे उघड झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी जुझे फिलिप डिसोझा आणि नीळकंठ हळर्णकर यांना आपापल्या पदाचे राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाला दोघांनीही वाटाण्याच्या अक्षता लावून पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देण्याचे धारिष्ट्य दाखवले होते.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची तयारी चालवली असून त्यापूर्वीच कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचीही तयारी राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेत्यांनी चालवली आहे. दुसर्‍या बाजूने येत्या निवडणुकीपर्यंत जुझे फिलिप डिसोझा आणि नीळकंठ हळर्णकर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेस पक्षाशी घरोबा करणार असल्याची कुणकुणही पक्षश्रेष्ठींना लागली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा काढून घ्यावयाचा असेल तर, विधिमंडळ गटनेते प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सध्या हे पद जुझे फिलिप डिसोझा यांच्याकडे आहे. तसेच, त्यांना पक्षातून काढून टाकले तरीही राष्ट्रवादीला कोणताच मोठा फरक पडणार नसल्याने त्यांची गटनेते पदावरून गच्छंती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार मिकी पाशेको यांच्यावर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी पूर्ण विश्‍वास दाखवला आहे तर, येत्या विधानसभा निवडणुकीत चाळीसही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचे आश्‍वासन मिकी यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे.

No comments: