‘रेडिफ’ पाहणीचा निष्कर्ष
-पुन्हा संपुआला सत्ता नाही
-‘हिंदू दहशतवादा’चा धोका नाही
-राहुल पंतप्रधान बनणार नाहीत
-चलनवाढ रोखण्यात अपयश
नवी दिल्ली, दि. २९ : २०१० साल मावळत असतानाच, केंद्रातील संपुआ सरकारही जनतेच्या मनातून उतरल्याचे ‘रेडिफ’या संकेतस्थळाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले असून, जनतेच्या दृष्टीने या सरकारला अखेरची घरघर लागली आहे. अनेक घोटाळे आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे दिवसेंदिवस गर्तेत चाललेले हे सरकार शक्य तेवढ्या लवकर सत्ताभ्रष्ट व्हावे, अशीच जनतेची इच्छा असल्याचे या पाहणीने दाखवून दिले आहे.
सरकारच्या सध्याच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना फक्त ९ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे तर ७६ टक्के जणांनी संताप व्यक्त करताना सरकारच्या कारभाराचे वर्णन ‘दयनीय’ असे केले आहे. केवळ १५ टक्क्यांना विद्यमान सरकारची कामगिरी साधारण वाटते. घोटाळे आणि भ्रष्टाचारामुळे केंद्र सरकारची प्रतिमा काळवंडली आहे, असे मत ८९ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे, तर फक्त ७ टक्के लोकांनाच तसे वाटत नाही. उर्वरित वाचकांनी उत्तरच न देणे सोयीस्कर मानले आहे. आता मध्यावधी निवडणुका झाल्या तर संपुआला पुन्हा सत्ता देणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ८१ टक्के लोकांनी ‘नाही’ असे म्हटले आहे. राहुल गांधी व दिग्विजयसिंग हे कॉंग्रेसचे नेते म्हणतात, त्याप्रमाणे हिंदू दहशतवादाचा धोका देशाला आहे का, या प्रश्नाला ८८ टक्के नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले आहे. चलनवाढ रोखण्यात सरकारला यश आले आहे का, या प्रश्नाला ८२ टक्क्यांनी नाही असे उत्तर दिले आहे तर फक्त ५ टक्के जणांना सरकारचे यश भावते. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर सरकारने पुरेशी सुरक्षा व्यवस्था केल्याने आपण सुरक्षित असल्याचे मानता का, या प्रश्नाला १६ टक्क्यांनी होकारार्थी उत्तर दिले आहे, तर ३३ टक्क्यांनी नकारार्थी उत्तर दिले आहे आणि ४९ टक्क्यांनी तीव्र संताप व्यक्त करून या नरकात किती दिवस राहावे लागेल, अशी विचारणा केली आहे.
राहुल गांधी भविष्यात पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे का, या प्रश्नाला ५१ टक्क्यांनी नकारार्थी उत्तर दिले आहे, ३१ टक्क्यांनी होकारार्थी तर इतरांनी कोणीही पंतप्रधान असला तरी फरक पडत नाही, अशी नाराजी व्यक्त केली आहे. देशाचे परराष्ट्र धोरण विफल ठरत असल्याची प्रतिक्रिया ५४ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Thursday, 30 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment