भाजपची मागणी
वाजपेयींचे ८७ व्या वर्षांत पदार्पण
नवी दिल्ली, दि. २५ : राष्ट्रीय राजकारणात ‘भीष्म पितामह’ म्हणून ओळखले जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ म्हणून गौरव करावा, अशी मागणी भाजपाने आज केली. अटलजींनी आज वयाच्या ८७ वर्षांत प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथसिंग, जसवंत सिंग यांच्यासह अनेक नेत्यांनी आज वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या विविध क्षेत्रात वाजपेयी यांनी जे योगदान दिले आहे, ते अभूतपूर्व आणि अविस्मरणीय असून, ते ‘भारत रत्न’ पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र आहेत, असे मत वाजपेयींच्या निवासस्थानातून बाहेर आल्यानंतर राजनाथसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
संसदीय लोकशाहीत अटलजींनी दिलेले योगदान हा देश कधीच विसरू शकत नाही. राष्ट्रीय राजकारणाला त्यांनी नवी दिशा दिलेली आहे. त्यांचे योगदान अतुलनीय असल्यानेच सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी भाजपाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय राजकारणाचे मूल्य झपाट्याने घसरत असताना ते जोपासण्याचे महत्त्वाचे काम करणारे वाजपेयी हेच होते आणि म्हणूनच त्यांना आज राष्ट्रीय राजकारणातील भीष्म पीतामह म्हणून ओळखले जाते, असेही ते म्हणाले.
भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी वाजपेयी यांचे वर्णन थोर पुरुष असे केले. आशियात त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त कुठेही नाही. त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्याच्या मागणीकडे केवळ भाजपाची मागणी म्हणून न पाहता वाजपेयी यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन हुसेन यांनी केले.
Sunday, 26 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment