मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): आपल्या मंत्रिमंडळ समावेशा बाबत कॉंग्रेस नेते हरिप्रसाद जे काय बरळत आहेत त्याची आपणास अजिबात फिकीर नाही कारण आपला पक्ष वेगळा आहे व नेतेही वेगळे आहेत, आपले पक्षनेते आपणाला योग्य तो न्याय मिळवून देतील याची आपणास पूर्ण खात्री आहे अशी प्रतिक्रिया गोव्याच्या राजकारणात मावळत्या वर्षात विविध कारणांनी चर्चेत असलेल्या मिकी पाशेको यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्यातील युती ही निवडणूकपूर्व आहे. म्हणून त्या युतीतील तरतुदींचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक आहे. त्यानुसारच राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात दोन जागा मिळालेल्या असून मंत्री कोण असावेत हे राष्ट्रवादीने ठरवायचे आहे. त्यात इतर कोणी नाक खुपसण्याचे कारण नाही. कॉंग्रेसमधील दहा जणांच्या गटाने तर नाहीच नाही, असे त्यांनी बजावले. त्यांनी खुद्द हरिप्रसाद यांना राजकीय परिपक्वता दाखवा व अन्य पक्षांच्या व्यवहारांत तोंड खुपसण्याचे टाळा असा सल्ला दिला.
आपले नेते शरद पवार आहेत. त्यांचा आदेश आपण प्रमाण मानू. कॉंग्रेसमधील दहा जणांचा गट जे काय बरळतो त्याचा आपणावर काही एक परिणाम होणार नाही. ही मंडळी करीत असलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, आपणावर अजून आरोपपत्रदेखील सादर झालेले नाही. मग आरोप सिध्द होण्याची गोष्ट बाजूलाच राहिली, उलट आपणाला कलंकित म्हणणार्यांवर आरोपपत्रे पोलिसांकडून दाखल झालेली आहेत तर काहीजण कॉफेपोसाखाली स्थानबद्ध झाले होते. आपल्या मंत्रिपदाबाबत आता पक्षश्रेष्ठीच काय ते ठरवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मिकींच्या कडव्या समर्थक असलेल्या जिल्हा पंचायत सदस्या नेली रॉड्रिगीस म्हणाल्या, राष्ट्रवादींने मिकीबाबत आपले म्हणणे कॉंग्रेसला कळवले आहे. त्याबाबत आणखी फक्त दोन दिवस प्रतीक्षा केली जाईल. त्यानंतर पुढील कृती केली जाईल.
Tuesday, 28 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment