वेश्या व्यवसाय प्रकरणी
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीला बांगलादेशातून वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणलेली महिला दलाल रंजना पाठक हिला आज बाल न्यायालयाने दोषी ठरवून ७ वर्षे आणि दोन महिन्यांची कैद व ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १४ महिन्यांची साधी कैद तिला भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी मुक्तता केलेल्या ‘त्या’ पीडित मुलीची तस्करी झाल्याचे आणि तिचा वेश्या व्यवसायासाठीच वापर केल्याचे उघड झाल्याने रंजना पाठक हिला दोषी ठरवण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निवाड्यात नमूद केले आहे. भा. दं. सं ३२३, ३४२, ३६६ व बाल कायदा ८ या कलमांनुसार तिला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
२००५ मध्ये पर्वरी येथील हॉटेलमधून एका पीडित मुलीची पणजीतील महिला पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली होती. संशयित आरोपी रंजना पाठक व तिचा पती जीतू यांनी २००४ साली त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुबई येथे नोकरीला नेतो असे सांगून तिच्या कुटुंबीयांकडून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर भारतात आणून वेश्या व्यवसायासाठी ६० हजार रुपयांना तिची विक्री करण्यात आली. मुंबई तसेच अहमदाबाद येथील आपल्या फ्लॅटवर ठेवून त्यांनी तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. फ्लॅटवर येणार्या ग्राहकांना भेटण्यास नकार दिला तर आपल्याला बेदम मारहाणही करण्यात येत होती, अशी जबानी त्या पीडित मुलीने न्यायालयात दिली.
अहमदाबाद येथे असताना सर्वांची नजर चुकवून तिने या सर्व प्रकाराची माहिती बांगलादेश येथील आपल्या घरी फोन करून वडलांना दिली होती. आपण दुबईला नसून मुंबईलाच असल्याचेही तिने आपल्याला सांगितले होते, असे तिच्या वडलांनी आपल्या जबानीत सांगितले.
जुलै २००५ साली या मुलीला योगदीप हाटे आणि मनोहर कंग्राळकर यांनी वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणले. तिला पर्वरी येथील एका हॉटेलमध्ये ठेवून हे दोघे तरुण ग्राहक शोधण्याचे काम करीत होते. मात्र याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सामाजिक संस्थेच्या मदतीने पणजी येथील महिला पोलिस स्थानकाच्या निरीक्षक नूतन वेर्णेकर यांनी सदर हॉटेलवर छापा टाकून त्या मुलीची सुटका केली होती.
त्यानंतर अहमदाबाद गुजरात येथील आरोपी रंजना पाठक हिच्या फ्लॅटवर छापा टाकून तिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पाठक हिच्या विरोधातील सर्व आरोप सिद्ध झाल्याने तिला शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणाचा तपास निरीक्षक नूतन वेर्णेकर यांनी केला होता.
Saturday, 1 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment