८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दणक्यात उद्घाटन
स्वा. सावकर साहित्य नगर, ठाणे, २५ डिसेंबर (महेश पवार): जगातील कोणतीही भाषा, संस्कृती शासन जन्माला घालत नाही असे सांगत ते म्हणाले, मराठी भाषा ही ज्ञानदायी, जीवनदायी आहे. ती बोलली तर प्रतिष्ठा कमी होत नाही, असा निर्धार केला तर वारंवार त्यावर बोलण्याची गरज भासणार नाही. कोणत्याही भाषेला येत असलेल्या अडथळे दूर करण्याचे काम शासनाचे आहे. भाषेला छत्रीसारखी सावली देण्याचे काम त्यांचे आहे. मराठी शाळा बंद होत असताना स्तःच्या पैशातून गुणवत्ता देणार्या शाळा सुरू करायच्या हे शासनाचे काम आहे. त्याबरोबरीनेच ग्रंथालयाच्या तब्येतीची काळजी घेण्याचीही गरज असल्याचे प्रतिपादन ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळेयांनी आज येथे केले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण समस्या, विविध समस्यांनी विखुरलेला महाराष्ट्र, जागतिकीकरणाचे वाढते स्तोम, नव्या-जुन्यांना लिहिते करण्याचा सल्ला, त्याचप्रमाणे बदलत्या प्रवाहातही मराठीचे स्थान कायम ठेवण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी प्रमुख मुद्यांचा समावेश त्यांच्या भाषणात होता.
सकाळी दहाच्या ठोक्याला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर साहित्य संमेलनाच्या खर्या पर्वास आरंभ झाला. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी ८४ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मराठी अभिमानगीत सादर केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष गुरुनाथ दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे महापौर अशोक वैती, शिवसेनचे ठाणे जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे, आ. संजय केळकर, कपूर वासनिक, आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणाच्या छापील परंपरेला छेद देत संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केलेले उत्सूर्तपणे भाषण साहित्य संमेलनाचे आगळेपण ठरले. त्यांच्या भाषणापूर्वी बेळगाव - कारवार येथून आलेल्या साहित्य प्रेमींनी ‘कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. त्या घोषणांचा धागा पकडतच संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणास सुरवात केली. ‘मी ज्या मातीत जन्माला आलो. त्याचा आवाज कानी पडला. कारवार, निपाणी, बेळगावचा समावेश महाराष्ट्रात व्हावा, ही मराठी जनतेची इच्छा आहे, असे सांगत त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासापीठावर थेट शेतकर्यांच्या प्रश्नालाच हात घातला.
आत्महत्या करणार्या विद्यार्थांचा, शेतकर्यांचा, एड्सग्रस्तांचा, अनुशेषग्रस्तांचा असा हा महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्र हा तुकड्यातुकड्यात विभागलेला आणि त्याच महाराष्टाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी बोलत असल्याचे स्पष्ट करत संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, भाकरीकरता मी अनेक स्थित्यंतरे केली. अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक समस्यांची जाणीव झाली. १९६० मध्ये जेव्हा महाराष्ट्राचा जन्म झाला तेव्हा मी मराठी अक्षरांची बोटे धरत होतो. ही भूमी शेतकर्यांची, कष्टकर्यांची, कामगारांच्या तळहातावर उभी आहे. अनेक वादळे येतात, संकटे येतात, महापूर येतो, महागाई वाढते, महायुद्ध होते तेव्हा तेव्हा शेतकरीच का मरतो, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
युद्ध नको मला बुद्ध हवा. युध्दाला माझा नकार आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले. साहित्यात माझे खूप बाप आहेत, खूप आया आहेत. त्यांच्या साहित्यातूनच मी घडत गेलो. त्यांच्या थोर परंपरेचे बोट पडकून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. आज जग प्रचंड गतीने धावत आहे. संगणकाने पृथ्वी गतीमान केली. स्पर्धात्मक युग बनले आहे. आज जखमी तळहातावर घेऊन मानवी मूल्ये जपत आहे. मात्र, त्या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात दिसत आहे का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. संवेदनाधिन माणसाचे प्रतिबिंब माझ्या साहित्यात का दिसत नाही? साहित्याचे नवीन जग का जन्माला येत नाही? ज्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित झाले त्या प्रमाणात मराठी साहित्य विकसित का झाले नाही? या त्यांच्या प्रश्नांनी सभागृह स्तब्ध झाले.
जागतिकीकरण स्थिर झाले, पण त्यामुळे माणसाच्या ओंजळीत काही पडले का? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले. जागतिकीकरणामुळे आज जातीव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात खतपाणी घातले जात आहे. पूर्वीची जातीव्यवस्था आणि आताची जातीव्यवस्था यात बदल झाला आहे. आता बिस्लरीचे पाणी पिणारे वेगळे, बीएमसीचे पाणी पिणारे नळवाले, बोम वॉटर पिणारे तर पाणी न पिता कोल्ड्रिक्स वर जगणारे, अशा नव्या जाती जन्माला आल्या आहेत. नव्या नव्या जातीचे खाद्यपदार्थही मिळू लागले आहेत. पुण्यात धनगरी मटण नावाची डिश मिळते, हॉटेलमधील मेनूकार्डातही ही जातीव्यवस्था घुसली आहे आणि विशेष म्हणजे, त्या सर्वांना मान्यताही मिळू लागली आहे. हे होत असताना मराठी तत्त्वज्ञानाची दखल घेण्यात येत आहे का? इतिहासाला आता तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. नव्या बदलाचे वारे वहात असताना येत्या काळाची चाहूल लक्षात ठेवायला हवी. मी कोणत्याच वादाला घाबरत नाही. पण त्यावर मी प्रतिक्रियाही देत नाही. जागतिकीकरण पकडायला आपणास ङ्गार उशीर झाला. साहित्यामध्ये आजचे, उद्याचे प्रतिबिंब उमटते. साहित्य म्हणजे माणसाचे प्रतिबिंब आहे. त्याकरता आजच्या, उद्याच्या लेखकांनी सगळ्या प्रक्रिया समजावून घेतल्या पाहिजेत. जागतिकीकरणाचे तोंड बघणार नाही, असे म्हणणार्यांनी मात्र, नंतर त्या प्रक्रियेत स्वतःलाच सामावून घेतले. त्यामुळे नव्या व्यवस्थेचा शोध घेणारी कविता आता जन्माला यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लङ्गडं बंद करा!
प्रमाण आणि अप्रमाण याचे लङ्गडं आता बंद करायलाच हवे. साहित्याच्या या व्यासपीठावर येण्यासाठी आज ग्रामीण भागातील अनेक बोलीभाषा ताटकळत उभ्या आहेत. त्या बोलीभाषांना या व्यासपीठावर बोलवा. त्यांच्या भाषा शिका आणि स्ट्रॉंग व्हा! ग्रामीण भागातील बोलीभाषांचे टॉनिक पिऊन मराठी भाषेला समृद्ध करा. वैचारिक साहित्याचा दुष्काळ परवडणारा नाही. २५ ते २० वर्षांपूर्वी जे लढत होते ते लिहत होते. तेव्हा जे लिहत होते ते लढत होते. पण, त्या लढायाच आता लोप पावत चालल्या आहेत, असेही संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितले.
Sunday, 26 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment