वातावरण तणावपूर्ण; ईगल फोर्स व राखीव दलाची तुकडी तैनात
चौघा जणांना अटक
म्होरके अलगद निसटले
महिलांसह तेरा जखमी
हल्लेखोरांचे वाहन जप्त
दोन गटांतील वैमनस्य
मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघातील त्यांचा बालेकिल्ला गणल्या जाणार्या मोतीडोंगरावर आज दोन गटांत अचानक उसळलेल्या हिंसाचारात महिलांसह तेरा लोक जखमी झाले असून त्या सर्वांना हॉस्पिसियुत दाखल करण्यात आले आहे; पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. तथापि, यातील म्होरके त्यांच्या हाती लागले नव्हते. या घटनेने मोतीडोंगरावर तणाव निर्माण झाल्याने रात्री तेथे ईगल फोर्स व राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात करण्यात आली. पोलिस अधीक्षक ऍलन डिसा स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी याप्रकरणी त्वरित तक्रार नोंदवून घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी लालासाब बादशहा,अन्वर शेख,नबीसाब बवार व अमीन बवार यांना अटक केली आहे. तर या प्रकरणाचे म्हारके असलेल्या बशीर शेख व अमीन शेख यांचा शोध कसून घेतला जात आहे. यातील जखमी व संशयित हे गाजलेल्या मोतीडोंगर तलवार प्रकरणातील आरोपी आहेत. सायंकाळी उशिरा घडलेल्या या प्रकाराने मोतीडोंगरावर दहशतमय वातावरण निर्माण झाले. त्यातून तेथील वस्त्यांत हलकल्लोळ माजला. केंद्रीय राखीव पोलिसांची बटालियन तेथे दाखल होईपर्यंत तो कायम होता. गेल्या पालिका निवडणुकांतून दोन गटांत निर्माण झालेल्या संघर्षाची परिणती या हिंसाचारात झाली.
पोलिसांत आलेल्या तक्रारीनुसार कदंब बसस्थानक ते मोतीडोंग अशी वाहतूक करणारी मकबूल शेख शिर्सी याची (जीए०२-टी-४२४१) ही मिनीबस टाटा सुमोतून (जीए०२ सी-७४५१) आलेल्या बशीर शेख, त्याचा भाऊ अमीन शेख व गृहनिर्माण मंडळांतील चौघे अशा गटाने मिलिटरी कँपजवळ रोखली. मकबूल याच्या डोळ्यावर स्प्रे मारण्यात आला. नंतर त्याला ओढून बाहेर काढले व लोखंडी सळ्या आणि दंडुक्यांनी मारहाण केली. असे असूनही तोे त्यांच्या तावडीतून निसटून थेट हॉस्पिसियुत आला.
मकबूल तेेथून सुटल्यावर तो गट मोतीडोंगरावर मकबूलच्या घरात गेला व तेथे त्याच्या बायको-मुलीला धमकी दिली. तसेच त्यांना मारहाण केली. नंतर त्यांनी आपला मोर्चा मकबूलचा भाऊ मर्दान अली शिर्सी याच्या घराकडे वळवला. त्याची बायको मुनिरा ही गरोदर असून त्यांनी तिला धमकी दिली. तसेच मुलगी तेजोद्दिन हिला मारहाण केली व उभयतांच्या अंगावरील सुमारे दीड लाखांच्या वस्तू पळवल्या.
त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या मदतीस धावून आलेल्या शेजार्यांनाही त्यांनी मारहाण केली. त्यातून २० दिवसांची बाळंतीणही सुटली नाही. तेवढ्यात गृहनिर्माण मंडळातील आणखीन एक गट आला व त्यांनीही मारहाण सुरू केली. त्यांच्याकडे सुरे होते अशी तक्रार या रहिवाशांनी केली. त्या लोकांत रफीक तंबाक, अन्वर तंबाक, रब्बानी तंबाक, वशीर शेख, जमील शेख व अमीन शेख यांचा समावेश होता असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
एव्हाना मकबूल जखमी होऊन हॉस्पिसियुत दाखल झाल्याचे वृत्त समजताच त्याचे साथीदार तेथे धावून गेले. त्यांच्या मागावर हल्लेखोर तेथे गेले असता हॉस्पिसियुजवळ जमलेल्या मकबूलच्या लोकांनी सुमोवर हल्ला करून ती फोडली. नंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून पोलिसांनी ती जप्त केली. ती नबी साब याची असून तीत लोखंडी सळ्या व दंडुके आढळले.
नंतर उभय गट पोलिस स्टेशनवर एकत्र आले आणि तेथेच त्यांच्यात जुंपली. पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. या प्रकरणी फरारी असलेल्या म्होरक्यांचा शोध घेतला जात असून उपअधीक्षक उमेश गावकर पोलिस स्टेशनात तर निरीक्षक संतोष देसाई मोतीडोंमगरावर तळ ठोकून आहेत.
जखमीत बशीर गद्दारी,नवशार संकूर,बशीर देवगिरी,मुस्ताक, अस्लम धारवाड,अलीफ, हजरत अली यंाचा समावेश असून त्यानंतर आणखी काहींना हॉस्पिसियुत आणण्यात आले होते.
रात्री उशिरापर्यंत पोलिस या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात व्यस्त होते.
राजकीय दडपणामुळेच पोलिस यंत्रणेने मोतीडोंगरावरील या गुंडगिरीकडे दुर्लक्ष केले व त्यामुळेच तिला खतपाणी मिळत गेले असा आरोप या पार्श्वभूमीवर लोकांतून केला जात आहे. या लोकांविरुद्ध पोलिसांत किमान २५ गुन्हे नोंद झाले आहेत; तर पोलिसांना हवे असलेले संशयित हे मोतीडोंगर तलवार प्रकरणात गुंतले आहेत.
Wednesday, 29 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment