पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या गोवा वैद्यकीय मंडळाच्या निवडणुकीत डॉ. शेखर साळकर, डॉ. गोविंद कामत, डॉ. ग्लॅडस्टन डिकॉस्ता, डॉ. राजेंद्र तांबा व डॉ. दिनेश वळवईकर यांनी बाजी मारली आहे तर, डॉ. दिगंबर नाईक व डॉ. उल्हास कर्पे यांना पराभव स्वीकारावा लागला. पाच जागांसाठी हे मतदान झाले होते.
येत्या काही दिवसांत या मंडळाची बैठक होणार असून त्यावेळी अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे, या मंडळावर सरकारतर्फे एक डॉक्टर आणि एक वकील नियुक्त केले जाणार आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, आरोग्य खात्याचे संचालक व गोवा विद्यापीठाच्या प्रतिनिधीची या मंडळावर नेमणूक केली जाणार आहे.
या निवडणुकीसाठी १ हजार ६०० डॉक्टरांपैकी ७६४ डॉक्टरांनी टपालाद्वारे मतदान केले. यात डॉ. साळकर यांना ६१७, डॉ. कामत यांना ६३२, डॉ. डिकॉस्ता ४५०, डॉ. तांबा ५३० व डॉ. वळवईकर यांना ४२९ मते मिळाली.
ऍलोपॅथिक पद्धतीने प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांवर नजर ठेवण्याची जबाबदारी या मंडळावर असते. तसेच, कोणत्याही डॉक्टरांच्या विरोधात तक्रार आल्यास त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकारही या मंडळाला आहेत. काही ठिकाणी नोंदणी न केलेले डॉक्टरही रुग्णांना तपासत असल्याने त्यांच्यावरही कारवाई केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Thursday, 30 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment