इस्लामाबाद, दि. २५ : तालिबानने ४८ तासांच्या आत बुनेर सोडून निघून जावे अन्यथा पाकिस्तानी लष्कर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही अशा कडक शब्दात पाकचे लष्कर प्रमुख जनरल अश्फाक कयानी यांनी इशारा दिला आहे.
तालिबानच्या वाढत्या कारवाया आणि पाकमधील वाढत्या वर्चस्वामुळे पाकिस्तानी लष्कराच्या "प्रोफेशनल' या ख्यातीला चांगलाच हादरा बसला आहे. आता तर पाकी जनतेचाही आपल्या सैन्यावरून विश्वास उडत चालला आहे. काही बंदूकधाऱ्यांच्या दराऱ्याला एवढी मोठी फौज घाबरत असल्याचे पाकिस्तानी जनतेला वाटते. यामुळे अहंभाव दुखावलेल्या कयानी यांनी तालिबान्यांना कठोर शब्दांत "निर्वाणीचा इशारा' दिला आहे.
तालिबानला ४८ तासांच्या आत बुनेर सोडून निघून जाण्याचा इशारा कयानी यांनी दिला असून जर तालिबानने हेकेखोरपणा सोडला नाही तर त्यांना धडा शिकविण्यासाठी लष्करालाही आदेश देण्यात आले असल्याची माहिती रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयाच्या सूत्राने दिली आहे.
पाकिस्तानी लष्कर कोणत्याही स्थितीत तालिबानला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. कोणाचेही वर्चस्व पाकच्या भूमीवर आम्ही खपवून घेणार नाही. अशांना परत पिटाळूनच आमचे सैनिक दम घेतील असा विश्वास कयानी यांनी व्यक्त केला आहे. कयानी कितीही आरोळ्या ठोकत असले तरी पाकमधील खरी स्थितीत जगापासून लपून राहिली नाही. आजवर यांनी बघ्याची भूमिका घेतली असे पाकिस्तानी मुत्सद्यांना वाटते. या "अल्टीमेटम'कडे पाकी लष्कराची प्रतिष्ठा सुधारण्याचा प्रयत्न म्हणून बघितले जात आहे.
Sunday, 26 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment