Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 26 April 2009

'आमचे पाय अजूनही जमिनीवरच' लिटल चॅंपच्या पंचरत्नांशी सुसंवाद रंगला

पणजी,दि.२५ (प्रतिनिधी) : 'आमच्या डोक्यात अजून हवा गेली नाही त्यामुळे आमचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत.झी मराठी सारेगमप मालिकेमुळे आम्हा सर्वांना लोकप्रियता मिळाली. तथापि, त्यामुळे आम्ही फार मोठे कलाकार झालो आहोत, असे अजिबात वाटत नाही,'असे उद्गार आर्या आंबेकरने काढले.लिटल चॅम्प्सच्या "पंचरत्नां'चे आज गोव्यात आगमन झाले.पणजी येथील कांपाल मैदानावर आयोजित कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेल्या या छोट्या कलाकारांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ही मुले प्रगल्भतेच्या बाबतीतही खरोखरच "चॅंपियन'असल्याची सहजच प्रचिती आली.
"तरूण भारत'व तरंगिणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या लिटल चॅंप्सना प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याची संधी गोमंतकीयांना मिळाली."झी' मराठी सारेगमप या मालिकेतून आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मोहून टाकलेल्या या कलाकारांचा आत्मविश्वास कुणालाही लाजवेल असाच होता.आपल्या भविष्यातील प्रवासाबद्दल हे छोटे कलाकार ठाम असल्याचे त्यांच्याशी संवाद साधला असता प्रकर्षाने जाणवले.
चौथी उत्तीर्ण होऊन आता पाचवीत गेलेली मुग्धा वैशंपायन हिचे विलोभनीय हास्य पाहातच राहावे असे. येत्या २९ रोजी या लिटल चॅप्ससाठी केसरी टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सतर्फे विदेशात सफर आयोजित केली आहे,याबाबत तिला बरीच उत्सुकता दिसली.शाळा व कार्यक्रम यांची सांगड कशी घालता,असे विचारले असता कार्यक्रमाला जाताना पुस्तके सोबत घेऊनच जातो,असे प्रथमेश लघाटे म्हणाला.परीक्षेची तयारी करण्यासाठी सुट्टी होती त्यामुळे अभ्यास करायला मिळाला,असेही तो म्हणाला.
लिटल चॅम्प्सच्या महा अंतिम फेरीनंतर आतापर्यंत एकूण १० कार्यक्रम केल्याचे रोहित राऊत म्हणाला. "युनिव्हर्सल'तर्फे "पंचरत्न'ही डीव्हीडी प्रकाशित करण्यात आली असून याच कंपनीतर्फे नव्या गाण्यांची व मूळ आवाजातील गाण्यांची सीडी तयार केली जाणार असल्याचे त्याने सांगितले.झी सारेगमप विजेती कार्तिकी गायकवाड काहीशी गप्पच होती. गोव्यातील प्रसन्न वातावरणामुळे भारावून गेेलल्या कार्तिकीदेवींना काय बोलावे तेच सुचेनासे झाले होते.आपण सध्या आपल्या बाबांकडे शिकते व यापुढे पंडित अजय पोहनकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेणार असल्याचे ती म्हणाली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने किती गाणी तयार केली,असा सवाल केला असता किमान शंभर असतील,असे आर्या म्हणाली.नाट्यसंगीत हा आपला आवडता प्रांत व नाट्यसंगीतातील दैवत म्हणजे पं.जितेंद्र अभिषेकी. तेच आपले गुरू होते. नाट्यसंगीताची ही परंपरा पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून त्याबाबतची उदासिनता दूर करणे हे आपले लक्ष्य असल्याचेे प्रथमेश म्हणाला. अभिजात शास्त्रीय संगीतात पुढे जाण्याची आपली इच्छाही त्याने यावेळी प्रकट केली.
"आम्हा कलाकारांवर लोकांनी एवढं भरभरून प्रेम केले आहे की, त्यामुळेच आम्ही आज या जागेवर पोहचलो'असे आर्या म्हणाली.आम्ही आमच्या मित्रांशी नेहमीसारखेच वागतो व मित्रही तसेच वागतात त्यामुळे या यशाचा मैत्रीत कोणताही अडथळा येत नाही, असे या कलाकारांनी गप्पांच्या ओघात सांगून टाकले.
डॉ.अजय वैद्य यांनी प्रास्ताविक केले व या पंचरत्नांची ओळख करून दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना या कलाकारांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली व त्यामुळे हा सुसंवादाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

No comments: