पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) : माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांना लागू केलेला निकष आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही लागू करावा व त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने जारी केल्याने त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे,अशी मागणी ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी केली आहे.
ऍड. आयरिश यांना जीवे मारण्याची धमकी मोबाईवरून दिल्याप्रकरणी विश्वजित राणे अडचणीत आले आहेत. पणजीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शर्मिला पाटील यांनी जुने गोवे पोलिसांना आरोग्यमंत्र्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्याचे आदेश दिल्याने त्याचे थेट परिणाम सरकारवर होणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ऍड. नार्वेकर यांच्याविरोधात क्रिकेट तिकीट घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते व ते निमित्त पुढे करून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाग पाडले होते.
कॉंग्रेसच्या एखाद्या मंत्र्यांविरोधात आरोपपत्र सादर झाल्यास त्या मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,असा पायंडा कॉंग्रेसश्रेष्ठींनी पाडला असल्याचे सांगण्यात आले होते. साहजिकच नार्वेकरांप्रमाणे आरोग्यमंत्र्यांविरुद्धही आरोपपत्र दाखल होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडावे,अशी मागणी ऍड. रॉड्रिगीस यांनी केली आहे.
नार्वेकरांकडील मंत्रिपद काढून त्याजागी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली होती. मुळात ऍड.रॉड्रिगीस धमकी प्रकरणी सरकारी वकिलांनी सुरुवातीस आरोग्यमंत्र्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिले होते. जुनेगोवे पोलिस निरीक्षक गुरूदास गावडे यांनी या प्रकरणाची चौकशीच बंद करून ते फाईलबंद करण्याचे प्रयत्न केल्याने ऍड. रॉड्रिगीस यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. निरीक्षक गावडे यांनी याप्रकरणी प्रॉसिक्युशन संचालकांच्या आदेशानुसार आपण आरोपपत्र दाखल केले नसल्याचे म्हटले होते.
आरोग्यमंत्री राणे आपल्या पदावर राहिल्यास ते पोलिस चौकशीत हस्तक्षेप करण्याचा धोकाही ऍड. रॉड्रिगीस यांनी व्यक्त केला. आरोपांतून दोषमुक्त होण्यापूर्वी विश्वजित यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व निःपक्षपाती व दबावविरहित चौकशीस साहाय्य करावे,असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री कामत यांनी तात्काळ राणे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडावे अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा,अशी मागणी राज्यपाल एस. एस. सिद्धू यांच्याकडे आपण करणार आहोत, असेही ऍड.रॉड्रिगीस यांनी नमूद केले.
Sunday 26 April, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment