Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 29 April 2009

आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यात कामत अपयशी, डॉ. विलींचे टीकास्त्र

पणजी, दि.२८(प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत हे विद्यमान आघाडी सरकारचे नेते या नात्याने सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी ठेवला आहे. आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना ताब्यात ठेवण्याचे कसब कामत यांच्याकडे नाही. विद्यमान मंत्रिमंडळातील एक नेता आपल्याच सहकाऱ्यांविरोधात अपात्रता याचिका दाखल करतो व मुख्यमंत्री मात्र त्रयस्थपणे हा प्रकार बघतात, ही नामुष्की आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय स्थित्यंतर घडेल, अशी भविष्यवाणीही डॉ. विली यांनी केली.
"प्रुडंट मीडिया'या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. विली यांनी हे सडेतोड भाष्य केले.विद्यमान आघाडी सरकारात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा प्रमुख घटक आहे पण मुख्यमंत्री मात्र राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदारांवर अविश्वास दाखवतात, असा टोलाही यावेळी डॉ. विली यांनी हाणला. आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीची एकही बैठक झालेली नाही. मुख्यमंत्री कामत समन्वय समितीची बैठक बोलावण्यास पुढाकार घेत नाहीत, असा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.
राष्ट्रवादीचे नेते तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याशी डॉ. विली यांचे असलेले वैरही या मुलाखतीच्या निमित्ताने प्रकट झाले. राष्ट्रवादीतर्फे आपण सुरुवातीस एकमेव आमदार सरकारात होतो. "अलोन' आमदार अशी आपली ओळख करून दिली जात होती, परंतु जेव्हा मिकीकडून भाजपचा राजीनामा देण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्याशी संपर्क साधला व त्यांना आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिला. मिकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अजिबात अनुकूल नव्हते. त्यांनी आपल्याकडे संपर्क साधून मिकी यांना पक्षप्रवेश देण्याच्या निर्णयाबाबत विचारपूसही केली परंतु आपण त्यांना याबाबत खात्री दिल्याचा गौप्यस्फोटही डॉ. विली यांनी यावेळी केला. मिकी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दिलेल्या प्रवेशाबाबत पश्चात्ताप होतो का, असे विचारण्यात आले असता राजकारणात पश्चात्ताप करायचा नसतो तर आपण केलेल्या चुका सुधारायच्या असतात, बोध घ्यायचा असतो, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मिकी यांनी आपलेच सहकारी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व सरकार पक्षातील आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांच्याविरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका ही मुख्यमंत्री कामत यांच्यासाठी नामुष्की असल्याची टीका डॉ. विली यांनी केली. याप्रकरणी आपण मुख्यमंत्री कामत यांना मिकी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचा सल्ला दिला होता परंतु हे धाडसी पाऊल उचलण्याची ताकद त्यांच्यात नाही, असेही यावेळी डॉ. विली म्हणाले.
राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांच्या विजयाबाबत आशावाद व्यक्त करणारे डॉ. विली याबाबत ठामपणे मात्र काहीही सांगू शकले नाही. ही टक्कर अटीतटीची होणार व विजेत्या उमेदवाराचे मताधिक्य नाममात्र असेल, असे ते म्हणाले. निवडणूक झाली असली तरी उत्तर गोव्यात झालेल्या मतदानाबाबत उमेदवाराकडून आपल्याला कोणताही अहवाल पुरवण्यात आला नसल्याचे ते म्हणाले. देशप्रभू यांनी आपल्याला विश्वासात घेऊन अधिक नियोजनबद्ध प्रचार केला असता तर त्याचा अधिक लाभ झाला असता असेही खोचक विधान त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी एकही उमेदवार नव्हता काय, असे विचारले असता त्यांनी याचा ठपका पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांवर ठेवला. पक्षातर्फे उमेदवारीसाठी नावांची यादी तयार झाली असतानाही मिकी व नीळकंठ हळर्णकर यांनी माजीमंत्री निर्मला सावंत यांचे नाव पुढे केले. श्रीमती सावंत यांच्यासाठी ते इतकेच आग्रही होते तर त्यांना उमेदवारी का दिली नाही, असा प्रतिसवाल त्यांनी केला. दिल्लीत शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी ही उमेदवारी देशप्रभू यांना निश्चित झाली व त्यामागचे गूढ आपल्याला ठाऊक नाही, असेही ते म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता यावेळी डॉ. विली यांनी व्यक्त केली. हा काय बदल असेल याबाबत मात्र त्यांनी भाष्य करण्यास टाळले. हा बदल एक तर गोव्याच्या हिताचा ठरेल, अन्यथा गोव्याला बाधक ठरेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

No comments: