Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 1 May 2009

१०८ ने झिडकारले, मृत्यूने कवटाळले

वास्को, दि. ३० (प्रतिनिधी)- आपत्कालीन सेवा पुरवताना अनेकांना जीवनदान देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज वास्को शहरात मदतीची याचना करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला मृत्यूने कवटाळले. येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर मरणासन्न अवस्थेत पडलेल्या इसमाला काहीही होणार नसल्याचे सांगून त्याची साधी दखलही रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी न घेतल्याने ही घटना घडली, असा सूर येथून ऐकू येत आहे. जीवनदायिनी ठरलेल्या या सेवेकडून अशी वागणूक अपेक्षित नसल्याचे येथे बोलले जात आहे.
येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर असलेल्या पदपथावर एक ३५ ते ४० वर्षीय अज्ञात आजाराने फडफडत असल्याची माहिती आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील नागरिकाने वास्को पोलिस तसेच १०८ च्या रुग्णवाहिकेपर्यंत पोचवली. सदर इसम एकदम आजारी असल्याचे नजरेस येऊन सुद्धा त्याला काहीच होणार नसल्याचे वक्तव्य १०८ च्या कर्मचाऱ्यांनी केले व त्याला तेथेच सोडून निघून गेल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. मृत्यूशी झुंजणाऱ्या या इसमाने संध्याकाळी चारच्या सुमारास आपल्या प्राणाचा त्याग केला. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्यानंतरही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वास्को पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती.
दरम्यान, पोलिसांच्या पीसीआर वाहनातून १०८ रुग्णवाहिकेबरोबर सदर ठिकाणी पोचलेल्या साहाय्यक उपनिरीक्षक देविदास राणे यांनी "गोवादूत'शी बोलताना रुग्णवाहिकेने त्या आजारी इसमाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करताना याला पोलिस जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. येथील एका कापड व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका येथे वेळेवर पोचली, मात्र त्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्याने त्याची तथाकथित चेष्टा करून त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. रुग्णवाहिकेचा चालक मेहबूब अंबेकरी, ईएमटी (ईमरजन्सी मेडिकल टेक्निशियन) संकल्प सावंत यांनी याविषयी सारवासारव करताना सांगितले की, एक इसम अन्नपूर्णा हॉटेलसमोरील पदपथावर आजारी असल्याची माहिती मिळताच आम्ही रुग्णवाहिकेसह तेथे दाखल झालो. यावेळी या ठिकाणी चार जण झोपले होते, त्यातील एका इसमाला उठवला असता तो ठीकठाक असल्याचे आमच्या नजरेस आले. यानंतर ज्या दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला होता तेथे पुन्हा संपर्क साधला असता तो पी.सी.ओ. फोन असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
१०८ वरील कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर कदाचित त्या इसमाचे प्राण वाचू शकले असते, अशी शक्यता व्यक्त करताना संबंधित खाते याबाबत कोणती कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच मृत झालेल्या व्यक्तीची माहिती वास्को पोलिसांना देऊनसुद्धा दोन तास ते घटनास्थळी न पोचल्याने पोलिस खरोखरच जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याच्या बाबतीत सक्षम आहेत का, असा सवालही उपस्थित होत आहे.

No comments: