Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 25 October 2009

वास्कोच्या ठकसेनाकडून महत्त्वपूर्ण पुरावे हस्तगत

दोन्ही संशयितांना पोलिस कोठडी
पोलिसांचे दोघांच्या घरांवर छापे


वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) - लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनुसूचित जातीजमातीच्या सुमारे ८१४ जणांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणातील संशयित आरोपी सुरेश आजगावकर व त्याची साथीदार निरूपमा वेळीप यांच्या घरांवर छापे टाकून आज वास्को पोलिसांनी महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी निरूपमा हिला काल अटक केल्यानंतर आज तिला न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची तर आजगावकर याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वास्कोचे उपनिरीक्षक वीरेंद्र वेळुस्कर यांनी आजगावकर याच्या वास्कोत असलेल्या भाड्याच्या फ्लॅटवर, तर उपनिरीक्षक रजाक शेख यांनी निरूपमाच्या सासमोळे बायणा येथील घरावर छापे घातले असता त्यांना ह्या फसवणुकीच्या प्रकरणाबाबत पुरावे मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यामध्ये विमा "पॉलिसीची कागदपत्रे, बॅंक खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेच्या पावत्या, आजगावकर ट्रस्टबाबतची आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान संध्याकाळी वास्को पोलिसांकडून आरोपी आजगावकर याच्या घरात तपास सुरू असताना काही पत्रकारांनी येथे उपस्थिती लावली. त्यावेळी तेथे फ्लॅटमध्ये सुमारे साठ हजार किमतीचा "एल सी डी टीव्ही' तसेच इतर काही महाग वस्तू (कॅमेरा व इत्यादी गोष्टी) असल्याचे आढळून आले. एका साध्या दर्जाच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याकडे हे महागडे सामान घेण्यासाठी एवढी मोठी रक्कम कुठून आली असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
सुरेश आजगावकर याच्या पत्नीच्या नावे असलेली सुमारे दीड कोटी रुपयांची मालमत्ता वास्को पोलिसांनी यापूर्वीच जप्त करून गोठवली आहे. त्याची अन्य कोट्यवधी किमतीची आणखी मालमत्ता असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.

No comments: