Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 30 October 2009

भरदिवसा शिरवडे येथील सराफाच्या घरावर दरोडा

दोघींना दोरखंडाने बांधून ऐवज लंपास

मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी): दहा दिवसांमागे दागिन्यांचे दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्यानंतर त्याच सतीश वेर्लेकर यांच्या शिरवडे-नावेली येथील फ्लॅटमध्ये आज भरदिवसा सकाळी ११ वाजता चार जणांनी दरोडा घातला व सुऱ्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत, घरातील माणसांचे हातपाय दोरखंडाने बांधून गळ्यांतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १.१३ लाख रुपयांचा ऐवज पळविला. आजच्या भयंकर घटनेने त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ते चौघेही २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, कोकणी बोलत होते, असे घरच्यांनी सांगितले.
सतीश वेर्लेकर हे सराफ शिरवडे नावेली येथील सिवरेज प्लांटजवळीस बहुमजली इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहातात. सकाळी नेहमीप्रमाणे सतीश पिंपळकट्ट्याजवळील आपल्या दुकानात गेले होते. घरात त्यंाची पत्नी सौ. पुनम, विवाहित भगिनी सौ. सुचिता सुभाष शिरोडकर व तीन लहान मुले होती. सकाळी ११ वाजता कोणीतरी दारावरची घंटा वाजविली. पत्नीने दरवाजा उघडताच चौघेजण सुऱ्याचा धाक दाखवून आत घुसले व एकटा बाहेर थांबला. धारदार सुरा मानेभोवती फिरवत जीवे मारण्याची धमकी देत त्या चौघांनी पुनमचे हातपाय दोरखंडांनी बांधून त्यांना स्नानगृहात ठेवले व सुचिताचे हायपाय बंाधून खोलीत टाकले. त्यानंतर मुलांना धाक दाखवून गप्प केले व प्रत्येकाचे दागिने काढून घेतले. शिवाय घरातील ४० हजार रोख पळविली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांच्यासह उपनिरीक्षक गिरेंद्र देसाई यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. श्वानपथकही आणण्यात आले, तथापि त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान, १८ ऑक्टोबरला पहाटे रोजी पिंपळकट्टा मडगाव येथील याच सतीश वेर्लेकर यांच्या ज्वेलरी दुकानात ६ लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी वेर्लेकर रात्री ८.३० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी चोरी झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांस तक्रार नोंदवली होती. त्याचे दुकान पिंपळकट्टाजवळील मुंज यांच्या जुन्या घरात आहे. या घराच्या मागील बाजूने त्यांनी प्रवेश केला व ते दुकानापर्यंत गेले. लाकडी पार्टीशनला भोक पाडून त्यांनी दुकानात प्रवेश केला व सहा लाख रुपये किमतीचे दागिने लुटले. त्या चोरीसंबंधी गुन्हेगाराना पकडण्यात मडगाव पोलिसांना अपयश आले व आज सकाळी ११ वाजता भरदिवसा शिरवडे येथील घरात दरोडा घालून घरातील महिलांना बांधून ठेवले व लाखो रुपयांचा ऐवज पळविला.

No comments: