Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 31 October 2009

नरेंद्र मोदींना स्वाईन फ्लू

गांधीनगर, दि. ३० : दोन दिवसांपूर्वीच विदेश दौऱ्याहून परतलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाईन फ्लू झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.
५९ वर्षीय मोदी हे बुधवारी रशिया दौऱ्याहून परतले. त्यांना ताप, सर्दी, खोकला, कफ आदी लक्षणे जाणवू लागली. लगेचच डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि स्वाईन फ्लूची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. एच१एन१ची बाधा झाल्याने सध्या मोदींवर चार डॉक्टरांची एक चमू उपचार करीत आहे. त्यांना टॅमिफ्लू देण्यास सुरुवात केली असून किमान सात दिवसपर्यंत पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
त्यांच्या निवासस्थानीच त्यांना ठेवण्यात आले आहे. आगामी सात दिवसपर्यंतचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री मोदी यांची प्रकृती उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मोदींनी काल दिवसभर मंत्रालयात जाऊन सर्व कामे केली. मंत्रिमंडळाची बैठक घेतली, अधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या आणि सायंकाळपर्यंत आलेल्या सर्वांशी बोलले. नंतर त्यांचा ताप वाढला. त्यामुळे त्यांनी सर्व भेटी आणि कामे रद्द करून स्वाईन फ्लूची चाचणी करण्याचे ठरविले.

No comments: