Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 October 2009

'सनातन साधकांचा मानसिक छळवाद' पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): गृहमंत्री रवी नाईक यांनी स्फोटानंतर दोन तासांतच सनातन संस्थेला दोषी ठरवले. त्यानंतर सभापती प्रतापसिंह राणे व बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी ठोस पुरावा नसतानाही संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करून संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न केले तसेच या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस एकतर्फी तपासकाम करीत असून संस्थेच्या साधकांचा मानसिक छळ केले जात असल्याचा आरोप आज सनातन संस्थेचे विश्वस्त तथा व्यवस्थापक वीरेंद्र मराठे यांनी केला. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात न्यायालयात बदनामी खटला दाखल केला जाणार असून त्याविषयी कायदेशीर सल्ला घेण्याचेही काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मडगाव येथे जिलेटिन स्फोट झाल्यानंतर संशयाच्या घेऱ्यात आलेल्या सनातन संस्थेने प्रथमच पणजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन प्रभात या मुखपत्राचे संपादक पृथ्वीराज हजारे व त्रयस्थ म्हणून डॉ. कृष्णीमूर्ती राव उपस्थित होते.
कोणत्याही "सर्च वॉरंट' शिवाय पोलिसांनी ३ वेळी आश्रमाची झडती घेतली. आता साधकांच्या घरची झडती सुरू करून मानसिक छळ सुरू केला आहे. पोलिसांनी व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन करून मानहानी सुरू केली आहे. त्यामुळे ही अन्याय्य चौकशी बंद करावी आणि स्फोटाची दुसरी बाजू पडताळून पाहावी असा सल्लाही श्री. मराठे यांनी दिला. मयत योगेश नाईक याच्या दुचाकीवर कोणी अज्ञातांनी हे जिलेटिन पेरून स्फोट घडवून आणला आणि दोघांचा खून केला असल्याचा दावा यावेळी श्री. मराठे यांनी केला. आम्ही कधीही आश्रमाची झडती घेण्यासाठी पुन्हा येऊ, अशी धमकी पोलिसांनी दिली आहे. आश्रम म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा नाही. याठिकाणी कुटुंबे राहतात. काही लहान मुले आणि तरुण तरुणीही राहतात. पोलिसांच्या या दहशतीमुळे त्यांच्या कोवळ्या मनावर किती परिणाम होतो याचा प्रशासनाने विचार करावा, असे ते म्हणाले. काही दिवसांपासून पोलिसांनी आश्रमाच्या इमारतीविषयी चौकशी सुरू केली आहे. मडगाव येथे झालेल्या स्फोटाचा आणि आश्रमाच्या इमारतीचा का संबंध आहे, असा प्रश्न उपस्थित करून सनातन संस्था संघटितपणे काम करून मोठी शक्ती उभी राहिल्यास आपले ईस्पित साध्य करता येणार नाही, म्हणून हे षड्यंत्र सुरू असल्याचे श्री. मराठे म्हणाले.
या जिलेटिन स्फोटाचा तपासामुळे आश्रमात आलेल्या बॉम्ब निकामी पथकाच्या हाती एका साधकाची अलार्म असलेली घड्याळ लागले असून अशाच प्रकारची घड्याळे स्फोट करण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा करून ते जप्त केले आहे. सर्व तपास सर्चवॉरंट न दाखवता झाला. संगणकाच्या हार्ड डिस्कवरील मजकूर "कॉपी' करून घेतला. तसेच काही वस्तू जप्त केल्यात. परंतु, त्याचा कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
गृहखात्यातून सनातनच्या साधकाच्या शेजारील घरात दूरध्वनी करून आमच्या साधकांवर लक्ष ठेवा, म्हणून सांगितले जाते. आमच्या आश्रमात येणाऱ्या काही अधिकाऱ्यांचा सरकारी नोकरीत छळ केला जात आहे तसेच त्यांना आश्रमात न जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मुस्लिम धर्माच्या लोकांना सरकारी कार्यालयीन वेळी नमाज पडण्यासाठी मुभा दिली जाते. "नन'वर आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण होते म्हणून चर्चमध्ये जाण्यासाठी कोणाला अडवले जात नाही. हा केवळ सनातन संस्थेला संपवण्याचा कट रचण्यात आलेला असून काही लोक त्यासाठी पुढे सरसावले असल्याची टीका श्री. मराठे यांनी केली.
-----------------------------------------------------------------------
...त्यांना घरी पाठविणार
कोणत्याही तऱ्हेची समाजविघातक वृत्ती असलेल्या व्यक्तीने किंवा साधकांनी सनातनमध्ये राहू नये. तसेच अशा मनोवृत्तीचे कोणी असल्यास त्यांनी त्वरित आश्रम सोडावे तसेच कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये, असा आदेश सनातन संस्थेने काढला आहे. त्याचप्रमाणे, या वृत्तीचे कोणी आश्रमात राहत असल्यास त्यांना घरी पाठवावे, असेही आदेश वरिष्ठ साधकांना देण्यात आले आहेत.
--------------------------------------------------------------------------
'सनातन संस्थेची शिकवण चुकीची आहे' असे गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे. मौलवींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. इस्लामी अतिरेक्यांनी आत्तापर्यंत लाखो निरपराध लोकांना ठार केले आहे. चर्चमधील धर्मगुरूंकडून मुलांचे तसेच ननचे लैंगिक शोषण होण्याच्या अनेक घटना घडतात. म्हणून कोणी बायबल आणि कुराण यांची शिकवण चुकीची आहे, असे म्हणत नाही, असे मराठे म्हणाले.

No comments: