लक्ष्मीकांत शेटगावकर यांची टीका
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- टोरांटो चित्रपट महोत्सवात मला मिळालेले यश ज्यांच्या डोळ्यांत खुपते अशा काही लोकांनी मनोरंजन संस्थेतील अधिकारीवर्गाच्या संगनमताने चित्रपट क्षेत्रातील आपले स्थान कमी करण्याचा कपटी डाव आखल्याचा सनसनाटी आरोप "पलतडचो मनीस' या चित्रपटाचे निर्माते लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी केला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या चित्रपटाची निवड व्हावी यासंदर्भात कोणताही अर्ज आपण गोवा मनोरंजन संस्थेला सादर केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इफ्फी ऐन तोंडावर आला असताना संस्थेच्या विविध कामांसाठीच्या निविदा जारी करण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले वादंग अद्याप शमलेले नसतानाच त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी अलीकडेच स्थानिक चित्रपट निर्मात्यांचे संस्थेकडे अर्ज आल्याचे म्हटले होते. त्यात त्यांनी शेटगांवकर यांचाही नामोल्लेख करताना या अर्जांवर संस्थेने नेमलेले परीक्षक मंडळ निर्णय घेणार असून त्यांनी निवडलेले चित्रपटच आगामी महोत्सवात दाखविण्यात येतील असे म्हटले होते.
त्याबाबत स्पष्टीकरण करताना शेटगांवकर यांनी आपण सोसायटीकडे कोणताही अर्ज सादर केला नसल्याचे सांगितले. तथापि चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे आपण आपल्या चित्रपटासाठी अर्ज पाठविल्याचे त्यांनी नमूद केले. मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीकडे इफ्फीसाठीच्या चित्रपट निवडीचे दोन विभाग आहेत. त्यात इंडियन प्रिमियर विभाग व लघुचित्रपट विभाग यांचा समावेश होतो. या विभागासाठी चित्रपट असल्यास त्यासाठी सोसायटीकडे अर्ज करावा लागतो.
उपरोल्लिखित दोन विभागासाठी निवड प्रक्रिया ठरविण्याचे अधिकार चित्रपट संचालनालयाने सोसायटीला दिले आहेत. त्यामुळे या विभागासाठी आवश्यक अटी व नियम तसेच प्रक्रिया ठरविण्याची व परीक्षक मंडळ नेमण्याची जबाबदारी ही सोसायटीवर आहे. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही विभागात शेटगावकर यांनी अर्ज केलेला नसून त्यांनी दिल्लीस्थित चित्रपट महोत्सव संचालनालयाला आपला अर्ज पाठविला आहे. तसेच नियमानुसार चित्रपट संचालनालयाकडील इंडियन पॅनोरमा विभागासाठी आपल्या चित्रपटाचा अर्ज पाठविल्यास तो इतर विभागात पुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही.
या एकंदर पार्श्वभूमीवर ज्याअर्थी शेटगांवकर यांनी इंडियन पॅनोरमासाठी संचालनालयाकडे अर्ज केला आहे ते पाहता इंडियन प्रिमियर व लघू चित्रपट विभागासाठी ते अर्जच करू शकत नाही. त्यांनीही आपण सोसायटीकडे तसा कोणताही अर्ज केला नसल्याचे सांगतानाच काही स्थानिक निर्माते व सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मला अपात्र ठरविण्याचा कुटील डाव आखल्याचा आरोप शेटगांवकर यांनी केला.
दरम्यान, इंडियन प्रिमियर विभागाच्या परीक्षक मंडळावर सदस्य असलेल्या मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी मंडळावरील एका सदस्याने आपल्याला दूरध्वनीवरून इंडियन प्रिमियर विभागासाठी अर्ज करण्याची गळ घातली होती, सदर सदस्याने या विभागात उद्घाटनपर चित्रपट म्हणून माझा चित्रपट प्रदर्शित करण्याचा ठेवलेला प्रस्ताव मी फेटाळल्याचेही शेटगावकर यांनी नमूद केले.
Monday, 26 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment