Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 October 2009

इतर मागासवर्ग सर्वेक्षणात मोठा घोळ गोमंतक भंडारी समाजाची टीका

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): राज्य इतर मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात भंडारी समाज बांधवांच्या यादीत मोठ्या प्रमाणात चुका आढळून आल्याची माहिती गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष मधुकर पोकू नाईक यांनी दिली. या यादीत खुद्द आपला व आपल्या कुटुंबीयांचाही समावेश नाही, यावरून हे सर्वेक्षण किती बेफिकीरपणे झाले आहे याची प्रचिती येते व त्यामुळे ही यादी रद्द करून फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आज पणजी येथील समाजाच्या कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपेंद्र गांवकर, ऍड.जयप्रकाश नाईक, रामदास नाईक आदी पदाधिकारी हजर होते. राज्यात सध्याच्या परिस्थितीत इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या किमान साडेपाच लाख असायलाच हवी पण या सर्वेक्षणानुसार ती कवळ २ लाखांच्या घरात दाखवण्यात आली आहे. भंडारी समाजाचे नेते तथा गृहमंत्री रवी नाईक, भाजपचे आमदार दामोदर नाईक,फोंडाचे नगरसेवक किशोर नाईक आदींचीही नावे या यादीत नाहीत. प्रत्येक तालुक्यात वेगळ्याच ज्ञातीच्या लोकांची नावे भंडारी समाजाच्या यादीत घुसडण्यात आली आहेत.त्यात ब्राह्मणापासून ते ख्रिस्ती व मुस्लीम लोकांचीही नावे भंडारी समाजाच्या यादीत आहेत,असेही यावेळी श्री.नाईक यांनी सांगितले.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्वेक्षण पूर्ण झालेच नाही पण सदर संस्थेला ७५ टक्के यापूर्वीच पोच झाली आहे. प्रत्येक अर्जाला सरकारकडून २५ रुपये याप्रमाणे हे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत तयार करण्यात आलेली यादी प्रत्येक पंचायत व पालिका कार्यालयात उपलब्ध असून तिथे लोकांनी आपल्या नावांचा त्यात समावेश झाला आहे काय, याची तपासणी करण्याचे आयोगाने कळवले आहे. आयोगाने केलेल्या पत्रात ही यादी तपासण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असली तरी या सर्वेक्षणातील घोळाबाबत माहिती देणारे पत्र आयोगाला केले जाईल व त्यात नियोजित पद्धतीने फेरसर्वेक्षण हाती घेण्याची विनंती केली जाणार आहे,असेही मधुकर नाईक म्हणाले. ही गोष्ट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नजरेस आणून दिली आहे व त्यांनी यात लक्ष घातले जाईल,असेही सांगितले आहे.
भंडारी समाजाचे सर्वेक्षण करताना संघटनेला विश्वासात घेतल्यास त्यासाठी सदर संस्थेला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी संघटनेतर्फे देण्यात आली. गोमंतक भंडारी समाजाच्या प्रत्येक तालुका समिती आहेत व त्यामुळे सर्वेक्षण करताना या समितीच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतल्यास हे काम अधिक सुटसुटीत व बिनचूक होऊ शकेल,अशी माहिती यावेळी देण्यात आली. सरकारने तात्काळ या घोळाची दखल घ्यावी व ही यादी रद्द करून फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, इतर मागासवर्गीयांत एकूण १८ विविध ज्ञातींचा समावेश होतो व त्यात भंडारी समाज हा प्रमुख घटक आहे.

No comments: