Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 28 October 2009

लॅंकशायरमधील फरारी आरोपी अजय कौशलला न्यायालयीन कोठडी


पोलिस रिमांड अर्जावर आज दुपारी निवाडा


मडगाव, दि.२७ (प्रतिनिधी) - कोलवा येथील आमींगो हॉटेलात मृत पावलेला ब्रिटिश नागरिक विल्यम स्कॉट याचा साथीदार असलेला अजय कौशल याला काल रात्री उशिरा कोलवा पोलिसांनी गोवा पोलिस कायद्याच्या कलम ४१ खाली स्थानबध्द केल्यानंतर आज रात्री रिमांडसाठी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश व्दीजपल पाटकर यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी पोलिसांच्या विनंतीवरील निकाल उद्या दुपारी अडीचवाजेपर्यंत राखून ठेवला असून तोपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
आज दुपारपासून कौशलप्रकरणी बरीच कायदेशीर लढाई झाली. त्याला लॅंकशायरमध्ये १५ वर्षें कारावासाची शिक्षा झालेली असून तो फरारी आरोपी असल्याचे आढळून आल्याने तेथील पोलिसांच्या विनंतीवरून त्याला रिमांडवर घ्यायचे म्हटले तरी गोवा पोलिसांकडे कोणताच पुरावा नव्हता, परंतु हे आंतरराष्ट्रीय प्रकरण असल्याने गोवा पोलिस कायदा कलम ४१ नुसार त्याला ६० दिवसापर्यंत रिमांडवर घेता येते, असा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला व त्यासाठी सल्ला देण्यासाठी खास दंडाधिकारी फारिया व शालिनी सार्दीन याही सुनावणीच्या वेळी दाखल झाल्या होत्या. रात्री ९ वाजता न्यायाधीशांच्या निवासस्थानी त्याला नेऊन तेथे ही सुनावणी झाली.
तत्पूर्वी दुपारी त्याला कोर्टात नेत असताना त्याने एकच हंगामा केला. ६ फुटांहून अधिक उंच व लांब रुंद व धष्टपुष्ट देहयष्टी असलेल्या कौशलला मडगाव पोलिस स्टेशनवरून रिमांडसाठी नेले जात असताना तो चिडून वृत्तछायाचित्रकाराच्या अंगावर धावून गेला. लगेच पोलिसांनी त्याला करकचून पकडले व जीपमध्ये कोंबले. कोलवा पोलिसही त्याला एका जीपमधून न्यायला घाबरत होते, नंतर मागे पुढे पोलिस बंदोबस्त ठेवून त्याला कोर्टात रिमांडसाठी नेण्यात आले. पण तेथे रिमांड हवा असेल तर त्यासाठीचे पुरावे सादर करा असे सांगण्यात आले व त्यानंतर त्याच्याबाबत तेथील दूतावासातून आलेल्या कागदपत्रांची शोधाशोध सुरु झाली. पोलिसांनी सुनावणीची मुदत परत परत लांबवत नेली ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत करून अखेर रात्री ९ वा . सुनावणी ठेवली गेली .
विल्यम स्कॉट व अजय कौशल हे दोघेही शनिवारी गोव्यात आले होते व कोलवा येथील एका हॉटेलात वेगवेगळ्या खोल्या घेऊन राहीले होते. तेथे रविवारी सकाळी स्कॉट मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्युचे नेमके कारण कळूं न शकल्याने पोलिसांनी ब्रिटीश दूतावासाशी संपर्क साधला व त्यामुळे त्याच्या सोबत आलेल्या कौशल याची माहितीही तेथे गेली व गेली सहा वर्षे फरारी असलेल्या खतरनाक आरोपी गोव्यात असल्याचे सर्वांना कळून चुकले नंतर कोलवा पोलिसांना ब्रिटीश पोलिसांकडून संदेश येताच त्यांनी काल रात्रीच त्याला स्थानबध्द केले व मडगाव पोलिस मुख्यालयात आणले.
पोलिसांनी नंतर त्याच्या हॉटेलांतील खोलीची झडती घेऊन काही कागदपत्र जप्त केले पण त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सूत्रांनी सांगितले.
लॅंकशायर येथील मोस्ट वॉंटेड अजय कौशल हा एक खतरनाक आरोपी मूळ भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. २००३ पासून तो फरारी होता. मॅंचेस्टेर येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याने त्याला लुटले होते व कोर्टाने त्याबद्दल १५ वर्षाची शिक्षा त्याला ठोठावली होती. त्यानंतर तो फरारी झाला होता व त्याचा शोध पोलिस घेत होते. त्याच्या बेपत्ता असल्याचे वृृत्त यापूर्वीच देशविदेशांतील वर्तमानपत्रात झळकले होते.काल त्या नावाची व्यक्ती गोव्यात आहे हे वृत्तवाहीनीवरून कळताच ब्रिटीश पोलिसांच्या सूचनेवरून कोलवा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी त्याला अटक केली व ब्रिटिश दूतावासाशी संपर्क साधला. ब्रिटनमधील पोलिस पथक एक दोन दिवसात त्याला ताब्यात घेण्यासाठी गोव्यात पोहोचणार आहे.
दरम्यान, विल्यम स्कॉटला मृत्यू कसा आला हे एक गूढ बनलेले असून कौशलनेच तर त्याचा खून केला नसावा ना असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे गोवा हे पर्यटन केंद्राबरोबर गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनले असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे , यापूर्वी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस सोबराजला गोव्यातच पर्वरी येथे मुंबई पोलिसांनी येऊन पकडले होते तर आता त्याच प्रकारचा कौशल अनायासे कोलवा पेालिसांच्या हाती लागला आहे. जर स्कॉट याला गूढ मृत्यु आला नसता तर कौशल गोव्यात आहे हेदेखील कोणाला कळले नसते.

No comments: