Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 October 2009

आत्मघाती बॉम्बस्फोटात पेशावरमध्ये ९० ठार, २०० जखमी

पेशावर, दि. २८ : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आज इस्लामाबादमध्ये असतानाच थोेेड्याच अंतरावर असलेल्या पेशावर शहराला तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा आपले लक्ष्य केले आहे. अन्नधान्याच्या ठोक व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पिपल मंडी या बाजारात आज अगदी गर्दीच्या वेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार कमीतकमी ९० लोक ठार झाले आहेत, तर २००वर लोक जखमी झाले असून जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा १०० वर जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तालिबान्यांकडून पाकिस्तानात दररोजच कोठे ना कोठे बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. परंंतु अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन पाकिस्तानात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीव व वित्त हानी करणारा बॉम्बस्फोट तालिबान्यांनी घडवून आणल्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या या अतिशक्तिशाली स्फोटाने हा परिसर तर दणाणून गेलाच परंतु स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. स्फोटात अनेक इमारती कोसळल्या, अनेक इमारतींना आगी लागल्या व या आगीने इतर इमारतींना आपल्या कवेत घेतल्याने आगीची तीव्रता वाढत गेली. स्फोट एवढा जबदरस्त होता की त्यात अनेकांच्या चिंधड्या उडाल्या. मृतांच्या तसेच जखमींच्या संख्येकडे बघता पेशावर येेथील रिडिंग हॉस्पिटलमध्ये तर आणिबाणी जाहीर करावी लागली आहे.
स्फोटानंतर प्रशासन व अन्य सरकारी तसेच गैरसरकारी यंत्रणांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. स्फोटात जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही मोठ्या प्रमाणावर लोक दबून असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर हा परिसर धुराने भरून गेला होता. रस्त्यांवर गर्दी एवढी होती की अग्निशमन दलाच्या तसेच ऍम्ब्युलन्सच्या गाड्या घटनास्थळी जाण्यास वेळ लागत होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
पेशावरमध्ये आज झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसली तरी गेल्या महिनाभरात झालेल्या बहुतांशी हल्ल्यांमागे तालिबानचा हात होता. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरची कारवाई पाकिस्तानी सैन्याने थांबवावी, या मागणीसाठी तालिबान्यांनी हे हल्लासत्र सुरू केले आहे. त्यात आतापर्यंत २०० नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

No comments: