Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 29 October 2009

दहा दिवसांच्या 'इफ्फी'त २०० चित्रपट

पणजी, दि.२८ : गोव्यात आयोजित ४० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत देशविदेशांतील २०० चित्रपट प्रदर्शित केले जातील. कला अकादमी पणजी येथे २३ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, १० दिवस हा महोत्सव चालेल.
यंदापासून उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक एस.एम.खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता या दोघांना संयुक्तरीत्या देण्यात येईल. विजेत्यांना प्रतिष्ठेचा सुवर्णमयुर पुरस्कार व ४० लाख रुपये, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि स्पेशल ज्युरी पुरस्कार विजेत्याला रौप्य मयूर आणि रोख रक्कम रू.१५ लाख देण्यात येईल.
इंडियन पॅनोरमातर्फे ४७ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून त्यात ज्युरीनी निवडलेले २६ फीचर व २१ नॉन फीचर चित्रपट दाखविण्यात येतील. यासोबतच नॅशनल फिल्म आर्काईव्हज ऑफ इंडिया, पुणेतर्फे पाच व्हिंटेज म्युझिकल हिट्स आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यात "दो आँखे बारा हाथ'(१९५७), "सागर संगम'(१९५८) आणि "अपुर संसार' (१९५९) यांचा समावेश असेल. भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत निळु फुले, प्रकाश मेहरा, शक्ती सामंत, फिरोझ खान, लीला नायडू व इतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. फिल्म विभाग, मुंबईतर्फे भारतीय संगीत आणि संगीतकार पं. भीमसेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खान,उस्ताद अमजद अली खान, पं. जसराज, नौशाद, के.एल.सैगल, बेगम अख्तर व महम्मद रफी यांच्यावर लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
आसामी चित्रपट उद्योग हीरक महोत्सव साजरा करीत असल्याचे भारतीय विभागात आसामी चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. जानू बरुआ, भाबेंद्रनाथ सायकीया, संतवाना बार्दोलोज आणि संजीव हजारीका यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. चित्रपट उद्योगात ५० वर्षे पूर्ण केलेल्यांचे चित्रपटही यावेळी प्रदर्शित केले जाणार असून, त्यात कमल हसन, आशा पारेख आणि सौमित्रा चटर्जी यांचा समावेश आहे.
"सिनेमा ऑफ दि वर्ल्ड' मध्ये निवड समितीने ४५ देशांतील सुमारे ६५ चित्रपटांची निवड केलेली आहे. आफ्रिका आणि लॅटीन अमेरिका या खंडांवर तर इटाली, फ्रान्स, पोलंड, क्रुएशिया, आणि इस्तोनिया या देशांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. "फिल्म इंडिया वल्डवाईड' विभागात, परदेशी भारतीयांनी एनआरआय वर तयार केलेले चित्रपट प्रदर्शित केले जाईल. व विदेशी फिल्म विभागात गुरींदर छडा, यु.के., मॅन्युएल दि ओलीव्हेरा, पोर्तुगाल व नॉन्झी निमीबुत्र, थायलैंड यांचा समावेश असेल. सोबत पाच युद्ध - विरोधी चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.
महोत्सवात "मालेगाव का सुपरमॅन' आणि "गब्बरभाई एमबीबीएस' हे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
चित्रपटांसोबतच ""हिंदी सिनेमातील बदलते प्रवाह'' या विषयावर शियामक दवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.तर किश्वर देसाई पुस्तकी संदर्भातून हिंदी सिनेमा यावर बोलणार आहेत.
प्रतिनिधी नोंदणी यापूर्वीच सुरु झालेली असून, सुमारे ३००० प्रतिनिधींची नोंदणी झालेली आहे. शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे. पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालयातर्फे नोंदणी करण्यात येत असून, शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.नोंदणीसंबंधी अधिक माहिती www.pib.nic.in वर उपलब्ध आहे.
मडगाव येथे १२०० आणि कला अकादमी पणजी येथे महोत्सवासाठी अधिक १०० जणांची अतिरिक्त आसन व्यवस्था करण्यात आली आहे. गोवा पोलिस, केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणार असल्याचे एस.एम.खान यांनी सांगितले.

No comments: